नवी दिल्ली : दिल्लीतील रणरणत्या उन्ह्यात आठवडाभर शिगेला पोहोचलेल्या प्रचाराची गुरुवारी सांगता झाली असून मतदानाच्या सहाव्या टप्प्यात राजधानीतील सात जागांसाठी शनिवारी २५ मे रोजी दिल्लीकर मतदान करतील. २०१४ व २०१९मध्ये दिल्लीतील सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी दिल्लीत भाजपला ‘हॅटट्रिक’ची अपेक्षा असली तरी, ‘आप’ व काँग्रेस आघाडीने आव्हान उभे केल्याचे मानले जात आहे.
प्रचाराच्या अखेरच्या चार दिवसांमध्ये भाजपचे सर्व मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत रोड शो करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन प्रचारसभा झाल्या असून अन्य नेत्यांचे गल्लीबोळात रोड शो आयोजित करण्यात आले होते. काँग्रेस-‘आप’च्या ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने मुख्यत्वे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे रोड शो झाले. काँग्रेसच्या वतीने गुरुवारी राहुल गांधी यांचे दोन रोड शो व प्रचारसभा झाल्या.
श्रीमंतांसाठी भाजप काय करणार?
ल्युटन्स दिल्लीतील मतदारांसाठी देशहितासाठी मोदींचे नेतृत्व, देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा असे राष्ट्रीय मुद्दे महत्त्वाचे असले तरी, उच्चभ्रूंना करात सवलत देणे आदी प्राप्तिकराशी निगडित प्रश्नांसंदर्भात भाजप काय करू शकेल, असा प्रश्न संवादादरम्यान फडणवीस यांना विचारला गेला. त्यामुळे उच्चभ्रू करदात्यांना भाजपकडून आर्थिक सवलतींच्या अपेक्षा असल्याचे स्पष्ट झाले. मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीयांसाठी करसवलत देण्यात आली असून दोन वर्गांतील करदात्यांकडे अधिक लक्ष दिले गेले आहे. उच्चभ्रू वर्गातील करदात्यांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >>>मारहाणीच्या घटनेनंतर खासदारकीचा राजीनामा देणार का? स्वाती मालीवाल म्हणाल्या, “मी…”
जेल का जवाब वोट से…
मद्याविक्री घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवालांना झालेल्या अटकेमुळे दिल्लीकरांमध्ये सहानुभूती निर्माण झाली होती. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न ‘आप’ने केला. केजरीवाल जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ‘जेल का जवाब वोट से’ ही प्रचार मोहीम ‘आप’ने दिल्लीभर राबवली. घराघरात जाऊन संजय सिंह, आतिशी आदी नेत्यांनी ‘आप’च्या मतदारांशी संपर्क साधल्याचे पाहायला मिळाले. भाजपने मात्र ‘आप’च्या भ्रष्टाचार विरोधात आक्रमक प्रचार केला.
फडणवीसांचा दिल्लीतील उच्चभ्रूंशी संवाद
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. उत्तर-पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली, चांदनी चौक मतदारसंघांमध्ये फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या. या मतदारसंघांतील व्यापारी वर्गाशी फडणवीस यांनी संपर्क केल्याचे पाहायला मिळाले. ल्युट्न्स दिल्लीतील उच्चभ्रूंचा मतदारसंघ असलेल्या नवी दिल्ली मतदारसंघातील बुद्धिजीवी, व्यापारी, व्यावसायिक, विविध संघटनांचे प्रतिनिधींशीही फडणवीस यांनी कॅनॉट प्लेसमधील रेस्ताराँमध्ये विशेष संवाद साधला.
दिल्ली जिंकणार तो देश जिंकणार? दिल्लीवर कब्जा करणाऱ्या राजकीय पक्षाची केंद्रात सत्ता स्थापन होते, अशी समजूत दिल्लीकरांमध्ये असल्याने भाजपकडून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असेल तर दिल्लीकरांनी मते द्यावीत, असे आवाहन भाजपकडून केले गेले. २०१४ व २०१९ मध्ये दिल्लीकरांनी मोदींसाठी भाजपला मते दिली होती, यावेळीही देतील, असा विश्वास फडणवीसांनी विशेष संवाद कार्यक्रमात व्यक्त केला. फडणवीसांसह भाजपच्या अन्य नेत्यांकडूनही मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन मतदारांना केले गेले.