Porsche Carrera Stucked in Pothole Video Viral : भारतामधील रस्त्यांचा दर्जा हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे. काही राष्ट्रीय महामार्ग आणि शहरांतील मुख्य रस्ते आधुनिक व बऱ्या स्थितीत असले तरी, अनेक शहरांमधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली ही शहरं रस्त्यांच्या बाबतीत अत्यंत वाईट असल्याची टीका नेहमीच ऐकायला मिळते. यासह राज्य महामार्गांची व राष्ट्रीय महामार्गांची देखील अनेक ठिकाणी दूरवस्था झाल्याचं पाहायला मिळतं. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे देशात दरवर्षी हजारो अपघात होतात आणि त्यात हजारो लोकांचे बळी जातात. तरीदेखील रस्त्यांचा दर्जा सुधारलेला नाही. दुसऱ्या बाजूला देशातील अनेक मोठे नेते विकसित देशांसारखे रस्ते भारतात दिसतील अशी आश्वासनं देत असतात.
सरकार जनतेकडून मोठ्या प्रमाणात रोड टॅक्स व टोल वसूल करतं. मात्र, त्या बदल्यात चांगल्या दर्जाचे रस्ते देत नसल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. महामार्गावरील रस्त्यांची दूरवस्था पाहून एका नेटकऱ्याने सरकारवर संताप व्यक्त केला आहे. महागडी पोर्शे कार राज्य महामार्गावरील खड्ड्यात अडकल्याचं पाहून एका कॉन्टेंट क्रिएटरने आपल्या देशात रोड टॅक्स हा एक मोठा घोटाळा असल्याची टिप्पणी केली आहे.
“भारतात रोड टॅक्स ही संकल्पना म्हणजे मोठा घोटाळा आहे असं वाटतं”
निखल सैनी या कॉन्टेंट क्रिएटरने एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक पोर्शे कार रस्त्यावरील खड्ड्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत निखिलने म्हटलं आहे की “भारतात रोड टॅक्स ही संकल्पना म्हणजे मोठा घोटाळा आहे असं वाटतं. पोर्शे कॅरेरा ही कार खरेदी करून त्यावर तब्बल २१ टक्के आरटीओ कर भरल्यानंतरही तुमची सुपरकार अशी एखाद्या खड्ड्यात अडकली तर काय होईल? आता हा व्हिडीओ पाहून अनेक जण एनएचएआयला (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) टॅग करून प्रश्न विचारतील. मात्र, अलीकडच्या काळात राज्य महामार्गांची अवस्था तर त्याहून वाईट आहे.”
…म्हणून मी पोर्शे खरेदी करत नाही : निखिल सैनी
दरम्यान, निखिलने हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, ही कार कोणाची आहे. कोणत्या रस्त्यावरील खड्ड्यात ही कार अडकली होती, याबाबतची माहिती दिलेली नाही. मात्र, ही कार त्याची नसावी. कारण एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर एक गमतीदार कमेंट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की “या अशा घटना पाहूनच मी पोर्शे, फेरारी किंवा लॅम्बोर्गिनी सारख्या कंपन्यांच्या सुपरकार खरेदी करत नाही.” यावर निखिलने म्हटलं आहे की “माझंही हेच कारण आहे. याच कारणामुळे मी पोर्शे कार खरेदी करत नाही.”