जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) निलंबित नेते तथा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला शुक्रवारी येथील विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या चार लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी एकामध्ये दोषी ठरवले. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट शनिवारी शिक्षेची घोषणा करतील.

हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील गन्निकाडा फार्महाऊसमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेशी संबंधित हा खटला आहे. २०२१ मध्ये तिच्यावर दोनदा बलात्कार झाल्याचा आरोप असून, आरोपीने हे कृत्य त्याच्या मोबाईलवर चित्रित केले आहे. बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या प्रज्वल रेवण्णाविरुद्ध चार वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्धच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

प्रज्वल हा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी हसनमध्ये प्रज्वल रेवण्णा याच्याशी संबंधित अश्लील चित्रफीत असलेले पेन-ड्राइव्ह प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. होलेनारसीपुरा टाऊन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यासंदर्भात जर्मनीहून बंगळूरु विमानतळावर पोहोचल्यानंतर गेल्या वर्षी ३१ मे रोजी ‘एसआयटी’ने त्यांना अटक केली होती.