Prakash Ambedkar on PM Modi & Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला लष्करी कारवाईद्वारे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२९ एप्रिल) हिरवा कंदिल दाखवला. मोदींच्या निवासस्थानी मंगळवारी संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी कधी, कुठे व केव्हा लष्करी कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य (फ्री हॅन्ड) संरक्षण दलांना असेल, असा स्पष्ट व थेट संदेश मोदींनी दिंला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे.
लष्कराला अशा प्रकारचे आदेश देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना असतो, पंतप्रधानांना नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. तसेच लष्कराला फ्री हॅन्ड देणं, पाकिस्तानचं पाणी अडवणं ही भाजपाची एक प्रकारची जुमलेबाजी (खोटा प्रचार) असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
“मोदींकडून स्वतःला सुरक्षेच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा प्रयत्न”
प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “भारताचे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर असतात, पंतप्रधान नव्हे. त्यामुळे पंतप्रधानांनी सैन्याला फ्री हॅन्ड दिला असं म्हणणं चुकीचं आहे. पंतप्रधानांकडे असं काही करण्याचा अधिकारच नाही. राष्ट्रपतींना लष्करी कारवाई करण्याचा सल्ला देण्याचं काम कॅबिनेट करतं. पंतप्रधान एकटे असा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत. तसेच हा फ्री हॅन्ड म्हणजे मोदींनी स्वतःला सुरक्षेच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख म्हणाले, “भारतीय सैन्य सुरुवातीपासूनच त्यांचं काम चांगल्या पद्धतीने करत आलं आहे आणि ते कधीही पंतप्रधानांवर अवलंबून राहिलेलं नाही. लष्करी निर्णय हे राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्यातील समन्वयाचा व एकत्र घेतलेल्या निर्णयांचा भाग असतात.”
पाकिस्तानचं पाणी अडवलं हा भाजपाचा जुमला : आंबेडकर
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मला आश्चर्य वाटतंय की ही बैठक मंत्रिमंडळ व विरोधी पक्षांच्या अनुपस्थितीत झाली आहे. मोदी राष्ट्रपती का बनू पाहतायत? पाकिस्तानचं पाणी अडवल्याचं वक्तव्य म्हणजे एक प्रकारचा जुमला (खोटं वक्तव्य) होतं. तसंच सैन्याला फ्री हॅन्ड देणं हा देखील एक जुमलाच आहे. उद्या भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात कारवाई केली तर त्याचं श्रेय केवळ आणि केवळ भारतीय सशस्त्र दलांना दिलं पाहिजे.”