Prashant Kishor On Bihar Election Results : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चर्चा असलेल्या जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, बिहारमधील एनडीएच्या यशामागे महिलांना १० हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपावर आता प्रशांत किशोर यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

भाजपा किंवा एनडीएने १० हजारांना मते विकत घेतल्याचा काँग्रेसचा आरोप प्रशांत किशोर यांनी फेटाळून लावला. ‘बिहारचे लोक १० हजारांना त्यांचं भविष्य विकणार नाहीत. लोक त्यांची आणि त्यांच्या मुलांची मते तुटपुंज्या किमतीत विकणार नाहीत’, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

प्रशांत किशोर काय म्हणाले?

“लोक म्हणत आहेत की मतदारांनी त्यांची मते १० हजार रुपयांना विकली. पण ते खरं वाटत नाही. येथील लोक त्यांचं भविष्य किंवा त्यांच्या मुलांचं भविष्य विकणार नाहीत. जर तुम्ही हिशोब केला तर १० हजार रुपयांचा प्रतिदिन असा हिशोब केला तर किती होतात? त्यामुळे एवढ्या क्षुल्लक किमतीत त्यांचं मत कोण विकेल? असं असलं तरी याबाबत वादविवाद सुरू आहेत”, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

प्रशांत किशोर राजकारण सोडणार का?

“काही लोकांचा प्रश्न आहे की नितीश कुमार यांच्या पक्षाला २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. त्याबाबत मी एक दावा केला होता. आता मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा सांगतो की मी ज्या २५ जागांबाबत बोललो होतो, त्या माझ्या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे. जर नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारने १.५ कोटी महिलांना वचन दिलेले २ लाख रुपये वाटले तर मी कोणत्याही अटींशिवाय राजकारण सोडेन. जर नितीश कुमार यांच्या सरकारने प्रत्येक महिलेला १०,००० रुपये दिले नसते तर जदयू पक्ष २५ पेक्षा जास्त जागा जिंकू शकला नसता”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे

निवडणुकीतील पराभवावर प्रशांत किशोर काय म्हणाले?

“आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, पण ते पूर्णपणे अयशस्वी झाले. हे मान्य करण्यात काही गैर नाही. आम्ही बिहारच्या सत्तेत बदल घडवून आणू शकलो नाही. मात्र, बिहारचं राजकारण बदलण्यात आम्ही नक्कीच काही महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आमच्या प्रयत्नांमध्ये म्हणजे जनतेने आम्हाला निवडून दिलं नाही, त्यात काही चूक झाली असेल. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला नाही, त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मी ती जबाबदारी १०० टक्के स्वतःवर घेतो की मी बिहारच्या लोकांचा विश्वास जिंकू शकलो नाही”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

“बिहारच्या लोकांना त्यांनी कोणत्या आधारावर मतदान करावं आणि त्यांनी नवीन व्यवस्था का निर्माण करावी? हे बिहारच्या लोकांना मी समजावून सांगण्यात कमी पडलो. त्यामुळे मी प्रायश्चित्त म्हणून मी २० नोव्हेंबर रोजी गांधी भितिहरवा आश्रमात एक दिवसाचं मौन उपवास करणार आहे. आमच्याकडून चुका झाल्या असतील, पण आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही”, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.