Prashant Kishor On Bihar record voter turnout : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. यानंतर राज्यात झालेल्या विक्रमी मतदानामागील कारणांची चर्चा सुरू आहे. निवडणूक रणनीतीकार राहिलेले आणि आता राजकारणात उतरलेले जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी यामागची दोन कारणे सांगितली आहेत.

प्रशांत किशोर यांच्या मते, यामागचे पहिले कारण म्हणजे लोकांना बदल हवा आहे आणि दुसरे कारण म्हणजे निवडणुकीत बिहारमधील स्थलांतरित कामगारांनी निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. हे स्थलांतरित कामगार सणासुदीच्या काळात घरी परतले होते आणि ते काही दिवस तेथेच थांबले. जन सूरज पक्ष पहिल्यांदाच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवत आहे.

निवडणूक आयोगाची आकडेवारी

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ जागांवर ६४.६६ टक्के मतदान झाले, जे २०२० च्या विधानसभा निवडणुकीतील ५७.२९ टक्के मतदानापेक्षा खूपच जास्त आहे आणि १९५१ नंतरचे सर्वाधिक मतदान आहे.

मतदानाच्या आकडेवारीबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये बिहारमध्ये आजवर झालेले हे सर्वाधिक मतदान आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, या मतदानाच्या टक्केवारीतून दोन गोष्टी उघड होतात – पहिली गोष्ट म्हणजे, ते गेल्या एक किंवा दोन महिन्यांपासूनच नाही तर गेल्या काही वर्षांपासून सांगत आहेत की, बिहारमधील ६० टक्के पेक्षा जास्त लोकांना बदल हवा आहे.

किशोर म्हणाले की, “मागच्या २५-३० वर्षात निवडणुकीबाबत एक उदासीनता राहिलेली आहे कारण लोकांना कोणताही राजकीय पर्याय दिसत नव्हता. आता लोकांकडे जन सुराजच्या रुपात एक पर्याय आहे.”

स्थलांतरित कामगार ठरणार एक्स फॅक्टर

प्रशांत किशोर असेही म्हणाले की, बिहारमध्ये बदलासाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. किशोर घरी परतलेल्या स्थलांतरित कामगारांबद्दलही म्हणाले की, “छठ नंतर, मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार येथेच थांबले. त्यांनी स्वतः मतदान केले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र ही मतदान करतील हे सुनिश्चित केले. यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.”

प्रशांत किशोर म्हणाले, “जे लोक असा विचार करत होते की महिला फक्त १०००० रुपयांची आर्थिक मदत मिळाल्याने निवडणुकीच्या निर्णय ठरवतील, ते चुकीचे आहेत. महिला महत्त्वाच्या आहेत, परंतु त्यांच्याही पलीकडे, स्थलांतरित कामगार या निवडणुकीत एक्स-फॅक्टर आहेत.”

तरुणांचे सर्वाधिक मतदान – किशोर

अनेक राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती तयार करणारे किशोर म्हणाले की, कोणत्याही राजकीय तज्ज्ञाने, पक्षाने किंवा नेत्याने इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा अंदाज वर्तवला नव्हता. ते म्हणाले, “बिहारमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मतदान होईल असा अंदाज कोणीही वर्तवला नव्हता. पहिल्यांदाच, तरुणांनी सर्वाधिक मतदान केले आहे. त्यांनी सर्वाधिक उत्साहाने मतदान केले आहे आणि ते त्यांच्या भविष्यासाठी बिहारमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि सुधारणांसाठी मतदान करत आहेत.”

निवडणूक ट्रेंडचा हवाला देत किशोर यांनी असा युक्तिवाद केला की मतदारांची इतकी मोठी संख्या राजकीय बदलाची इच्छेचे संकेत देते. ते म्हणाले, “एक किंवा दोन अपवाद असू शकतात, परंतु गेल्या वीस वर्षांत जिथे जिथे मतदारांची संख्या इतकी वाढली आहे, तिथे सत्ताधारी पक्षाला किंवा सरकारला त्याची किंमत मोजावी लागली आहे.”

मात्र या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा नेमका अर्थ काय आहे आणि त्यामुळे बिहारमध्ये सत्ता परिवर्तन होईल का, हे १४ नोव्हेंबरला समोर येणार आहे.