पीटीआय, अयोध्या

अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळय़ाची तयारी पूर्ण झाली आहे. आज, सोमवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण नगरी सजली आहे. तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशात रामभक्तीचे वातावरण आहे. अनेक शहरांमध्ये मिरवणुका काढण्यात येत आहेत. आजच्या या महासोहळय़ासाठी केवळ अयोध्याच नव्हे तर सगळा देश आतुर झाल्याचा प्रत्यय येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अमिताभ बच्चन, रजनीकांत, उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अंबानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह देशभरातील शेकडो मान्यवर आणि साधुसंतांच्या साक्षीने नव्याने बांधलेल्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा मुख्य सोहळा सुरू होईल आणि सुमारे ४० मिनिटे चालेल. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण होईल. कार्यक्रमासाठी निवडक लोकांनाच प्रवेश मिळणार असला तरी सोमवारी कोटय़वधी लोक दूरचित्रवाणी आणि ऑनलाइन माध्यमांतून हा सोहळा पाहण्याची अपेक्षा आहे. देशभरातील विविध मंदिरांमध्येही सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. 

हेही वाचा >>>“तमिळनाडूतल्या श्रीरामाच्या मंदिरांमध्ये भजन-किर्तनास आणि अयोध्येतल्या कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी”, सीतारममण यांचे गंभीर आरोप

गेल्या कित्येक महिन्यांपासून सोमवारच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. अयोध्या नगरीमध्ये फुलांची सजावट, रोषणाई करण्यात आली आहे. जोडीला रामायणाशी संबंधित विविध रांगोळय़ा आणि चित्रे रेखाटण्यात येत आहेत. जुन्या इमारती आणि मंदिरेही दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली आहेत. भाविकांसाठी विविध धार्मिक व सामाजिक संघटनांनी भोजनगृहांची व्यवस्था केली आहे. मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत मंदिरात प्राणप्रतिष्ठेपूर्वीचे विविध विधी पार पडले. मंदिरासाठी देशभरातून कुंकू, अत्तर, विशाल घंटा, महाकाय कुलूप, १०८ फूट लांबीची अगरबत्ती, १,११० किलोचा दिवा, १२६५ किलोचा लाडू अशा विविध भेटवस्तू आल्या आहेत. नेपाळमधील जनकपूर या सीतेच्या माहेरून तीन हजार भेटवस्तू पाठवण्यात आल्या आहेत.\

कडेकोट सुरक्षा

’ सोहळय़ासाठी शहर व

मंदिर परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था

’ १० हजार सीसीटीव्ही

कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ड्रोनची नजर

’ रासायनिक, जैविक, किरणोत्सारी हल्ल्यांबाबत जवानांना प्रशिक्षण

’ बुडण्याच्या घटना आणि भूकंपासारख्या आपत्तींचा सामना करण्यासाठी एनडीआरएफला प्रशिक्षण

’ आरोग्याशी संबंधित

संभाव्य आपत्कालीन प्रसंगासाठी सज्जता

’ विविध भाषा ज्ञात असलेले पोलीस तैनात