President Droupadi Murmu Rafale Moment With Pilot Shivangi Singh: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी अंबाला एअरबेसला भेट दिली. त्यांच्या या भेटीनंतर विंग कमांडर शिवांगी सिंह यांच्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये हवाई हल्ले केले तेव्हा पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे विमान पाडल्याचा आणि पायलट शिवांगी सिंह यांना ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. पण आज, जेव्हा शिवांगी सिंह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूसोबत एका छायाचित्रात दिसल्या तेव्हा पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला.

विंग कमांडर शिवांगी सिंह या राफेल विमान चालवणाऱ्या भारतातील एकमेव महिला पायलट आहेत. त्यांचे पती देखील लढाऊ विमानाचे पायलट आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल विमानांचा वापर केला होता.

शिवांगी सिंह यांचे शालेय शिक्षण वाराणसीमध्ये झाले आहे. यानंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आणि नंतर हैदराबादमधील भारतीय हवाई दल अकादमी मध्ये प्रवेश मिळवला. महिला लढाऊ वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीचा भाग म्हणून त्या २०१७ मध्ये हवाई दलात सहभागी झाल्या. शिवांगी सिंह यांनी सुरुवातीला मिग-२१ बायसन विमान चालवायच्या आणि नंतर हाय-स्पीड जेट्समध्ये प्रभुत्व मिळवले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी राफेल लढाऊ विमानातून यशस्वीरित्या उड्डण केले. याचबरोबर दोन लढाऊ विमानातून उड्डाड करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरल्या. मुर्मू यांनी यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या तळावर सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून उड्डण केले होते.

राफेल विमानातून उड्डाण घेण्यापूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जी-सूट परिधान केला होता. त्यांनी पायलटसोबत छायाचित्रासाठी काढण्यासाठी पोजही दिली. त्यांच्या विमानाने सुमारे ३० मिनिटे उड्डाण केले आणि सुमारे २०० किलोमीटर अंतर कापले आणि परत हवाई दलाच्या तळावर परतले. १७ व्या स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अमित गेहानी यांनी विमान चालवले. हवाई दलाच्या तळावर आगमन झाल्यानंतर राष्ट्रपतींना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांनी अनुक्रमे ८ जून २००६ आणि २५ नोव्हेंबर २००९ रोजी पुण्याजवळील लोहेगाव हवाई दल तळावरून सुखोई-३०एमकेआय लढाऊ विमानातून उड्डण केले होते.

फ्रेंच एरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले राफेल लढाऊ विमान सप्टेंबर २०२० मध्ये अंबाला हवाई दल तळावर भारतीय हवाई दलात औपचारिकपणे दाखल झाले. पहिले पाच राफेल विमान १७ व्या स्क्वॉड्रन, “गोल्डन अ‍ॅरोज” मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ही विमाने २७ जुलै २०२० रोजी फ्रान्सहून येथे आणण्यात आली होती.