जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पायाशी सगळी सुखे नतमस्तक होऊन उभी असतील अशी आपली समजूत असते. त्यांच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी गुप्तचर यंत्रणेकडे असते. मात्र खुद्द बराक ओबामांच्या पाकिटात काय आहे, याचा पत्ता कोणास असावा? आपल्या अध्यक्षांविषयी असलेल्या समजुतीला छेद देणारी घटना नुकतीच घडली आहे. न्यूयॉर्कमध्ये भोजनासाठी गेलेल्या ओबामा यांचे क्रेडिट कार्डच यंत्रणेद्वारे ‘नाकारले’ गेले. त्यामुळे क्षणभर आपलीच ओळख ‘चोरली’ गेली की काय, अशी शंका ओबामांना आली. मात्र नंतर ही बाब वेगळीच असल्याचे स्पष्ट झाले.
त्याचे झाले असे, अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा भोजनासाठी न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये गेले होते. भोजनानंतर बिल अदा करण्यासाठी त्यांनी आपले क्रेडिट कार्ड पुढे केले. मात्र क्रेडिट कार्डावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेने ते नाकारले. बऱ्याच दिवसांत ते कार्ड वापरले गेले नसल्याने हा पेच उद्भवल्याचे नंतर स्पष्ट झाले. मात्र ‘क्षणभर आपली ओळख चोरली गेली असावी की काय’, अशी शंका मनात आल्याचे ओबामांनी नमूद केले. ग्राहक वित्त संरक्षण विभागाच्या परिषदेसमोर ते बोलत होते. त्या वेळी अध्यक्षांच्या क्रेडिट कार्डाबाबतच काही घोटाळा झाला असेल की काय, अशी शंका अनेकांच्या मनात आली होती, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेत डेबिट आणि क्रेडिट कार्डाच्या वापराबाबत असलेली सुरक्षा व्यवस्था आता अधिक कडक करण्यात येईल, असेही ओबामा यांनी स्पष्ट केले. अमेरिकेत सध्या १० कोटींहून अधिक नागरिकांना क्रेडिट अथवा डेबिट कार्ड वापरताना व्यक्तिगतता भंगाच्या आव्हानाचा फटका बसतो. मीही हा फटका खाल्ला आहे, नशिबाने मिशेलकडे असलेले क्रेडिट कार्ड चालल्यामुळे मला त्या वेळी बिल चुकते करता आले, अशी मिश्कील टिपणीही ओबामा यांनी केली. मात्र त्याच वेळी सरकारी पातळीला क्रेडिट आणि डेबिट कार्ड वितरित करताना ‘आयडेंटिटी थेफ्ट’च्या (व्यक्तिगत माहितीच्या गोपनीयतेचा भंग) आव्हानावर मात करण्यासाठी अधिक काटेकोर उपाययोजना केल्या जाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President obamas credit card got rejected last month
First published on: 19-10-2014 at 04:20 IST