Donald Trump On India-US Relations: अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्याने दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर काय परिणाम झाले यावर भाष्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर टॅरिफ लादणे हे “सोपे काम नाही” कारण त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
हे सोपे काम नाही
“पाहा, भारत त्यांचा (रशिया) सर्वात मोठा ग्राहक आहे. मी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादला कारण ते रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. भारतावर टॅरिफ लादले सोपे काम नाही. हे खूप मोठे काम आहे आणि त्यामुळे भारतासोबत मतभेद निर्माण झाले आहेत. पण मी हे काम आधीच केले आहे. मी खूप काही केले आहे. लक्षात ठेवा की, ही आपल्या समस्येपेक्षा युरोपची समस्या आहे”, असे शुक्रवारी फॉक्स अँड फ्रेंड्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले.
भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवला
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अनेक जागतिक संघर्ष सोडवल्याचा दावा केला. “मी सात युद्धे थांबवली आहेत. ज्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षाचाही समावेश आहे. परंतु कांगो आणि रवांडा यांच्यातील युद्ध मोठे होते. मी ते सुद्धा सोडवले. ते ३१ वर्षांपासून चालू होते. यामध्ये, लाखो लोक मारले गेले”, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, ऊर्जा खरेदी राष्ट्रीय हित आणि बाजारपेठेच्या गतिशीलतेनुसार होते, असे म्हणत भारताने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीचे समर्थन केले आहे.
भारताचा मध्यमवर्ग अमेरिकेसाठी महत्त्वाचा
तत्पूर्वी, अमेरिकेचे भारतातील पुढील राजदूत म्हणून नामांकित केलेले सर्जियो गोर यांनी गुरुवारी म्हटले होते की, “संपूर्ण अमेरिकेपेक्षा मोठी मध्यमवर्गीय बाजारपेठ असलेल्या भारताने अमेरिकन कच्चे तेल आणि तेल उत्पादनांची खरेदी करावी, असे ट्रम्प प्रशासनाला वाटते.”
गोर यांनी अधोरेखित केले की भारताची १.४ अब्जाहून अधिक लोकसंख्या आणि त्याचा वेगाने वाढणारा मध्यमवर्ग अमेरिकेसाठी मोठी संधी आहे.
भारताबरोबर पुन्हा वाटाघाटी
गोर यांनी केलेल्या या वक्तव्याच्या एक दिवस आधी, अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी सूचित केले होते की, “भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवताच भारतासोबतच्या व्यापार करारावर पुन्हा वाटाघाटी सुरू होईल.”