पीटीआय, नवी दिल्ली
देशाची राज्यघटना तयार करताना घटनाकारांसमोर रामराज्याचा आदर्श होता असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केला. अयोध्येमधील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळय़ामुळे देशातील कोटय़वधी लोकांना एकत्र आणले आणि त्यावेळी देशाची सामुदायिक शक्ती दिसून आली असे ते म्हणाले.
या वर्षांच्या पहिल्या ‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले की, ‘‘घटनाकारांसमोर रामराज्याचा आदर्श असल्यामुळे मी २२ जानेवारीला अयोध्येत देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे याविषयी बोललो’’. प्रत्येकाच्या भावना समान आहेत, प्रत्येकाची भक्ती समान आहे. राम प्रत्येकाच्या शब्दांमध्ये आहे, राम प्रत्येकाच्या हृदयात आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी देशाने दिवाळी साजरी केली असेही मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा >>>Video : मालदीवच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी; राष्ट्राध्यक्ष मुइज्जूच्या पक्षाची दादागिरी
प्राण प्रतिष्ठा सोहळय़ाच्या वेळी दिसलेली सामुदायिक शक्ती देशाला प्रगतीच्या नवीन उंचीवर नेईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात मोदी पद्म पुरस्कार विजेत्यांविषयीही बोलले. यापैकी अनेक विजेते देशाच्या तळागाळात काम करतात, प्रसिद्धीपासून दूर राहून ते मोठे बदल घडवून आणतात अशी प्रशंसा त्यांनी केली.