पीटीआय, अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९९ वर्षीय मातोश्री हिराबेन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी सकाळी येथील यू. एन. मेहता इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी दुपारी रुग्णालयात आईची भेट घेतली.
मोदी हे अहमदाबादला पोहोचल्यानंतर लगेच रुग्णालयात गेले. तेथे ते तासभर थांबले होते. या वेळी त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशीही चर्चा केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही रुग्णालयात जाऊन हिराबेन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयातून बाहेर पडताना उपस्थितांना व प्रसारमाध्यमांना मोदींनी अभिवादन केले.
रुग्णालयाने निवेदनात म्हटले, की हिराबेन यांची प्रकृती स्थिर आहे. भाजप खासदार जुगलजी ठाकोर यांनी सांगितले, की, हिराबेन यांची प्रकृती स्थिर असून एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल. दरियापूरचे भाजप आमदार कौशिक जैन यांनीही सांगितले, की त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींचे मोठे बंधू सोमाभाई सध्या रुग्णालयात आहेत. पंतप्रधान मोदींचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत त्या गांधीनगर शहराजवळील रायसन गावात राहतात. पंतप्रधान नियमितपणे रायसनला भेट देतात व त्यांच्या बहुतेक गुजरात दौऱ्यांमध्ये आपल्या आईसह काही वेळ व्यतीत करतात.
राहुल गांधी, खरगेंसह काँग्रेस नेत्यांकडून प्रार्थना
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी वाडरा यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली. खरगे यांनी ‘ट्वीट’ संदेशात नमूद केले, की आम्ही पंतप्रधान मोदींच्या मातोश्रीची प्रकृती चांगली व्हावी, यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. त्या लवकरच बऱ्या होतील. राहुल गांधी यांनी ‘ट्वीट’ संदेशात म्हटले, की आई व मुलातील प्रेम हे शाश्वत व अमूल्य असते. मोदीजी या कठीण काळात माझ्या स्नेहभावना तुमच्यासोबत आहेत. तुमच्या मातु:श्री लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशा माझ्या सदिच्छा आहेत. प्रियंका गांधी म्हणाल्या, की या वेळी आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही सदिच्छा व्यक्त केल्या.
प्रल्हाद मोदी यांच्या प्रकृतीत सुधारणा
पंतप्रधान मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मंगळवारी कर्नाटकमधील कडकोलजवळ अपघात झाला होता. त्यात प्रल्हाद मोदी, त्यांचा मुलगा, सून, सहा वर्षांचा नातू आणि चालकांना किरकोळ दुखापत झाला होती. येथील जे.एस.एस. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी बुधवारी सांगितले. रुग्णांना सामान्य अंगदुखीशिवाय इतर कोणतीही मोठी समस्या नसून, संबंधित तज्ज्ञांनी त्यांची तपासणी केल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधु सी. पी. यांनी सांगितले. ते म्हणाले की ते बुधवार संध्याकाळ किंवा गुरुवारी सकाळपर्यंत रुग्णालयातच असतील. त्यांना रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय कुटुंबाशी सल्लामसलत करून वैद्यकीय पथकाद्वारे घेतला जाईल.