पीटीआय, विशाखापट्टणम
जग एका प्रकारच्या तणावातून जात आहे, अनेक क्षेत्रांमध्ये अशांतता आणि अस्थिरता वाढत आहे आणि अशा परिस्थितीत योग आपल्याला शांततेची दिशा दाखवतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागींना संबोधित करताना हा दिवस मानवतेसाठी एका प्राचीन पद्धतीची सुरुवात आहे. जिथे आंतरिक शांती ही जागतिक धोरण बनली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
दुर्दैवाने आज संपूर्ण जग कोणत्या ना कोणत्या तणावातून जात आहे. अनेक क्षेत्रांमध्ये अशांतता आणि अस्थिरता वाढत आहे. अशा परिस्थितीत, योग आपल्याला शांतीची दिशा देतो. योग हे एक विराम देणारे बटण आहे जे मानवतेला मोकळा श्वास घेण्यासाठी, जीवनात संतुलन शोधण्यासाठी आणि पुन्हा निरोगी होण्यासाठी आवश्यक आहे, असे मोदी या वेळी म्हणाले.
देशभरातील लाखो लोकांनी ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन योगासने आणि ध्यानधारणा करीत साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या शहरातून या उत्सवाचे नेतृत्व केले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. उत्तराखंडमधील देहरादून येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी योग भारताच्या शक्तीचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले. तर, योगाच्या शाश्वत ज्ञानाने लोकांना आरोग्य आणि सौहार्दाशी जोडण्याचे कार्य केले असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.
योग ही एक उत्तम वैयक्तिक शिस्त आहे. भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते, सर्वे भवन्तु सुखिन:, म्हणजेच सर्वांचे कल्याण हे माझे कर्तव्य आहे. ‘मी’ ते ‘आपण’ असा हा प्रवास सेवा, समर्पण आणि सहअस्तित्वाचा आधार आहे. ही विचारसरणी सामाजिक सौहार्द वाढवते. योगाने जगाला संघर्षाकडून सहकार्याकडे आणि तणावाकडून तणावमुक्तीकडे नेले पाहिजे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान