पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरतला भव्य रोड शो झाला. ११ किमीच्या या रोड शोमध्ये लाखोच्या संख्येनी जनतेनी सहभाग नोंदवला. भुवनेश्वर येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक संपवून पंतप्रधान मोदी हे आज सुरतमध्ये पोहचले. सुरतच्या विमानतळापासून सुरू झालेला हा रोड शो सर्किट हाऊस येथे आल्यावर संपला. विविध कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जनतेचे आभार असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटले आहे. सोमवारी पंतप्रधान एका रुग्णालयाची उद्घाटन करणार आहेत.

४०० कोटींची गुंतवणूक असलेल्या किरण मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अॅंड रिसर्चचे उद्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार आहे. त्यानंतर इच्छापूर या गावात हरी कृष्ण एक्सपोर्ट प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या एका युनिटचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस म्हणून कार भेट दिल्यानंतर हरी कृष्ण एक्सपोर्ट ही कंपनी चर्चेमध्ये आली होती.

त्यानंतर पंतप्रधान बीजापूर या गावी जाणार आहेत. त्या ठिकाणी सूरत जिल्हा दूध उत्पादन संघाचा एक कार्यक्रम आहे. या ठिकाणी आइसक्रीम उत्पादन प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याबाबतच्या योजनेसंबंधी पंतप्रधान या ठिकाणी बोलू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे. यावेळी देखील मोठ्या फरकाने निवडून येण्याचे भाजपे उद्दिष्ट आहे. अमित शहा मागील वेळी जेव्हा गुजरात दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी १५० जागा जिंकायच्या हे  आपले उद्दिष्ट आहे असे सांगितले होते.

या रोड शोचा आणि निवडणुकांचा काही संबंध नाही असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. तरी देखील निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे असा संकेत या रोड शोमुळे विरोधकांना गेला आहे.