विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर मंगळवारपासून संसदेत चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी सभागृहात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर टीका करताना खालच्या भाषेचा वापर केला. “अरे बस्स खाली बस्स… आमच्या पंतप्रधानांवर बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. तुझी औकात नाही. मी तुझी औकात काढेल”, अशा शब्दांमध्ये नारायण राणेंनी अरविंद सावंतांना इशारा दिला. यावरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
नारायण राणेंचं संसदेतील भाषण म्हणजे केंद्र सरकारमध्ये कशाप्रकारचे मंत्री आहेत, हे दर्शवतं. खालच्या पातळीचं राजकारण करणं आणि दुसऱ्यांवर अभद्र टिप्पणी करणं, यावरून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे दिसतं, अशा शब्दांत प्रियंका चतुर्वेदी यांनी टीकास्र सोडलं आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.
नारायण राणेंच्या संसदेतील भाषणावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाले, “मला फक्त दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे नारायण राणे मंत्री असूनही ते अशा भाषेचा वापर करत आहेत. हे केंद्र सरकारमध्ये कशाप्रकारचे मंत्री आहेत, हे दाखवतं. ज्याचं भाषेवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे ते अशा भाषेचा वापर करत आहेत. खालच्या स्तराचं राजकारण करणं आणि दुसऱ्यांवर अभद्र टिप्पणी करणं, यावरून दिसतं की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.”
“महाराष्ट्रातील जनता नारायण राणेंना त्यांची औकात दाखवेल. महाराष्ट्राच्या जनतेनं केवळ एकवेळा त्यांना त्यांची औकात दाखवली नाही, त्यांना अनेकदा औकात दाखवली आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेत मागच्या दारातून प्रवेश करावा लागला आणि ते राज्यसभेत आले. ते फक्त एका कारणासाठी मंत्री बनले आहेत. ते म्हणजे खालच्या पातळीवरचं राजकारण करता येईल. तुम्ही तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवा, संयम राखा आणि अशाप्रकारे मानसिक दिवाळखोरी नका दाखवू”, असंही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.