करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही अशी माहिती केंद्राकडून राज्यसभेत देण्यात आली. दरम्यान केंद्र सरकारच्या या दाव्यावरुन राजकारण पहायला मिळत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे की, “महामारीच्या काळात सरकारने ऑक्सिजनच्या निर्यातीत ७००% वाढ केली. त्यामुळे मृत्यू झाले. तसेच ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी सरकारने टँकरची व्यवस्था केली नव्हती. सशक्त गट आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष करून ऑक्सिजन देण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याबाबत कोणतीही सक्रियता दाखवली नाही.”

मंगळवारी राज्यसभेत सरकारला ऑक्सिजनच्या अभावामुळे किती रुग्णांचा मृत्यू झाला? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे सरकारने उत्तर दिले.

केंद्राने काय सांगितलं आहे

पहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी ३,०९५ मेट्रिक टन एवढी वाढली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ९,००० मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राला राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत सांगितले.

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर संजय राऊत संतापले; म्हणाले…

राज्यसभेत निवेदन देताना केंद्राने सांगितलं की, आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. तपशीलवार मार्गदर्शक सूचनांनुसार करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूची आकडेवारी नियमितपणे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे दिली जाते. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -१९ रूग्णांचा मृत्यू झाला का? या प्रश्नाच्या उत्तरावर आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी उत्तर दिले. “आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात.”

“केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही,” असं लेखी उत्तरात सांगण्यात आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi attack on modi government covid death oxygen central government monsoon session srk
First published on: 21-07-2021 at 12:28 IST