भारतीयांना गेल्या अनेक दशकांपासून अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतीक्षा होती. अखेर २२ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील मंदिरात श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भारतीय जनता पार्टी, श्री रामजन्मभूमी ट्रस्ट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या दिवशी अयोध्येत भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आयोजकांनी देशभरातील दिग्गज अभिनेते, कलाकार आणि क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं होतं. भाजपाचे नेते, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, संत-महंत आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांनादेखील या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनादेखील भाजपाने या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं होतं. मात्र काग्रेसने विनम्रपणे हे निमंत्रण नाकारलं. कोणताही काँग्रेस नेता या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही.

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून कित्येक भाजपा नेत्यांनी टीका केली होती. भाजपा नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही यावरून काँग्रेसवर टीका करत आहेत. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या तसेच काही राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाला न जाणं चूक मानलं आहे. यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका गांधी यांनी नुकतीच इंडिया टूडेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर प्रतिक्रिया दिली.

प्रियांका गांधी म्हणाल्या, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू लागलात तर तुम्ही काहीही बोलू शकता, कसलीही टीका करू शकता, अगदी धर्मावरूनही टीका करू शकता. परंतु, आमच्यासाठी धर्म हा राजकीय मुद्दा नाही. धर्म हा प्रत्येक भारतीयांच्या मनातला मुद्दा आहे. राम, कृष्ण किंवा भगवान शिव हे प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. धर्म असो अथवा आस्था असो, तिचा आदर व्हायला हवा. प्रत्येक भारतीयांच्या मनातील आस्थेचा आदर व्हायला हवा. आम्ही तो आदर करत असतो. राम मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाणं म्हणजे आमची चूक नव्हती. तुम्ही याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघताय किंवा भाजपाच्या दृष्टिकोनातून बघताय, म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल.

हे ही वाचा >> “२०१९ मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या घडामोडी; फडणवीस-तटकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजपाने आम्हाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. आम्ही त्या निमंत्रणाचा आदरच करतो. आम्ही आमच्या अधिकृत निवेदनात ते स्पष्ट केलं होतं. कारण जिथे आस्था आहे तिथे आम्ही आदर करतो. कारण आम्ही या देशाचे आणि या देशातील जनतेचे प्रतिनिधी आहोत. परंतु, मला नाही वाटत की आम्ही त्या कार्यक्रमाला न जाऊन काही चूक केली असेल. त्या कार्यक्रमाला त्यांनी राजकीय कार्यक्रम बनवलं होतं.