छत्तीसगडमधील एका प्रादेशिक चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेशकुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्या पाश्र्वभूमीवर, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रक्रिया अधिकाधिक सुलभ केल्या जातील, असे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेशकुमार यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली असून राकेशकुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. परिनिरीक्षण मंडळातील भ्रष्टाचाराची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. यापुढे सर्व प्रकारच्या प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक केल्या जातील, असे जावडेकर म्हणाले.
त्याचप्रमाणे ‘सीबीएफसी’मधील महत्त्वाची पदे रिक्त असून तेथे लवकरच व्यावसायिक अनुभव असलेल्या व्यक्तींची नियुक्ती केली जाईल. नवी पद्धत कशी असावी याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालय विचार करीत आहे, असेही ते म्हणाले.