आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवल्याबद्दल मध्य प्रदेशातील उज्जैनमधील विक्रम विद्यापीठातील प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशावरुन प्राध्यापक डॉ. राजू मुसळगावकर यांना निलंबित करण्यात आले आहे. विक्रम विद्यापीठात ते संस्कृत विषय शिकवतात. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता.

आदर्श अचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भाजपाला ३०० जागा मिळतील व राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल असे डॉ. राजू मुसळगावकर यांनी २९ एप्रिलला सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

राज्य युवक काँग्रेसचे सचिव बबलू खिनची यांनी मुसळगावकर यांच्या पोस्टविरोधात तक्रार केली व त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. भाजपाला अनुकूल पोस्ट करुन आदर्श अचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप बबूल खिनची यांनी केला होता. डॉ. मुसळगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांचे उत्तर तपासल्यानंतर विभागीय आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.