Raja Raghuvanshi Murder Case : मध्य प्रदेशातील इंदोरमधील सोनम आणि तिचा पती राजा रघुवंशी हे २२ मे रोजी शिलाँगमधून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला होता. राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आल्यानंतर सोनम रघुवंशी ही बेपत्ता झाली होती. त्यानंतर ९ जून गाझिपूरमध्ये सोनमला एका ढाब्यावर पोलिसांनी अटक केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात सोनमचा सहभाग आढळून आला.
या प्रकरणात आतापर्यंत सोनम आणि आणखी चार जणांना अटक करण्यात आलं आहे. यानंतर आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता एका प्रॉपर्टी डीलरला अटक करण्यात आलं असून प्रॉपर्टी डीलरचं राजाच्या हत्येशी कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणाचे पुरावे लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मेघालय हनिमून हत्याकांड प्रकरणात इंदूर पोलिसांनी रविवारी शिलोम जेम्स नावाच्या एका प्रॉपर्टी डीलरला पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिच्या मालकीची काळी बॅग या प्रॉपर्टी डीलर शिलोमने फेकल्याचा आरोप आहे. त्या बॅगमध्ये ५ लाख रुपये रोख, तिचे दागिने, एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तिचे कपडे होते, त्या सर्व वस्तू तपासाशी महत्वाच्या असल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, तपासादरम्यान अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी विशाल उर्फ विकी चौहान याने कथितपणे सांगितलं की त्याने त्याच्या इंदूरच्या निवासस्थानापासून त्याच शहरातील सोनमच्या लपण्याच्या ठिकाणासाठी ऑनलाइन ऑटो बुक केला होता. ज्यामध्ये तिचे कपडे, दागिने, ५ लाख रुपये रोख आणि एक पिस्तूल असलेली काळी बॅग होती. आरोपीच्या जबाबानंतर पोलीस इंदूर येथे पोहोचले. मात्र, ती काळी बॅग सापडण्यात अपयश आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस सध्या या बॅगेचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी फ्लॅटमधून काळी बॅग घेऊन जाताना आणि ती कारमध्ये ठेवताना शिलोम आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण समन्सला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांनी प्रॉपर्टी डीलर शिलोमचा फोन ट्रॅक केला आणि त्याला इंदूर-देवास रस्त्यावर शोधून काढलं आणि अटक केली. दरम्यान, स्थानिक न्यायालयाने शनिवारी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राजला राजाच्या हत्येप्रकरणी १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.