पीटीआय, शिमला/चंडीगड
हिमाचल, पंजाब, दिल्लीमध्ये पावसाचा जोर ओसरताच पूरग्रस्त भागात बचावकार्याला वेग आला आहे. पूरग्रस्त पंजाबमध्ये गेल्या चोवीस तासांपासून पावसाचा जोर ओसरताच दिलासा मिळाला असून बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. तर हिमाचल प्रदेशातील मणिमहेश येथे अडकलेल्या ३५० यात्रेकरूंची वायुदलाने सुटका केली. दिल्लीत यमुनेचा जलस्तर घटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, दिल्लीच्या जुन्या रेल्वे पुलावर यमुना नदीची पाण्याची पातळी शुक्रवारी सकाळी ८ वाजता २०७.३१ मीटर होती. दिवसभरात पाणी आणखी कमी होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
३५० यात्रेकरूंची सुटका
शुक्रवारी हिमाचल प्रदेशातील भरमौर येथे अडकलेल्या ३५० यात्रेकरूंना वायुदलाच्या हेलिकॉप्टरने चंबा येथे हलवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे चंबा जिल्ह्यातील विविध भागांत, शेकडो यात्रेकरू अजूनही अडकले आहेत.
पंजाबमध्ये पूरबळी ४३वर
पूरग्रस्त पंजाबमध्ये मृतांचा आकडा गुरुवारी ४३ वर पोहोचला आहे, तर १.७१ लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
देश आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी राष्ट्रपती मुर्मू
नवी दिल्ली : यंदा पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी तीव्र दु:ख व्यक्त केले. बाधित लोकांच्या दु:खात संपूर्ण देश त्यांच्यासोबत असून, या संकटात देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी सांगितले.