‘मिस शेफाली’ या नावाने लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री आरती दास यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ७६व्या वर्षी हृदय बंद पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील २४ परगना जिल्ह्यातील सोदेपुर येथील राहत्या घरात त्यांचे निधन झाले आहे. आरती दास या तीन बहिणींमधील सर्वात लहान.

६० ते ७०च्या दशकात आरती यांनी आपल्या नृत्य कौशल्याने लोकप्रियता मिळवली होती. त्यांनी १९६८ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चौरंगी’ या चित्रपटातून करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत ‘प्रतिद्वंदी’ आणि ‘सीमाबद्ध’ या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांतील नृत्य आणि अभिनयाने आरती यांना लोकप्रियता मिळाली होती.

आरती दास यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले. ‘मिस शेफाली या नावाने लोकप्रिय असणाऱ्या आरती दास यांचे अचानक निधन झाले आहे. त्यांनी सत्यजीत रे यांच्या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.