नवी दिल्ली : बिहारमध्ये पाटण्यात बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या विस्तारित बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, केंद्रातील मोदी सरकार मतचोरी करून सत्तेवर आले असल्यामुळे अवैध आहे, असा थेट गंभीर आरोप केला. पुढील महिनाभर अॅटमबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, प्लॅटिनम बॉम्ब फोडले जातील आणि भाजपच्या मतचोरीची प्रकरणं उघड केली जातील, असेही राहुल गांधींनी बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले.
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने घेतलेल्या या बैठकीमध्ये, पहिल्यांदाच थेट मोदी सरकारवरच हल्लाबोल केला गेला. यासंदर्भातील राजकीय ठरावही बैठकीमध्ये संमत केला गेला. ‘चोरलेल्या जनादेशावर व खोट्या मतदार याद्यांवर उभारलेले सरकार ना नैतिक आहे, ना राजकीयदृष्ट्या वैध. ते जनतेच्या विश्वासावर आधारलेले नसून फसवणुकीवर उभे आहे. खऱ्या लोकशाहीमध्ये सरकार लोकांना उत्तरदायी असते, पण, हे सरकार कोणालाही जबाबदारी नसल्याने बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, कोलमडलेली आरोग्यसेवा, उद्ध्वस्त शिक्षण व्यवस्था आणि ढासळलेली पायाभूत सुविधा अशा मूलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. जनतेची सेवा करण्याऐवजी फसवणूक व भीती या दोन घटकांवर टिकून राहिलेले केंद्रातील हे सरकार अत्यंत कार्यक्षम आहे’, असा आरोप ठरावामध्ये करण्यात आला आहे.
मत चोरून सत्ता मिळवणे ही केवळ एकच कृती नसून, ती संविधानावरील हल्ल्याशी, अर्थव्यवस्थेच्या कमकुवतपणाशी, सामाजिक न्यायाच्या विश्वासघाताशी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्याशी थेट जोडलेली आहे. या सगळ्या बाबी केंद्रातील सत्ता बेकायदा असल्याचेच उघड करते, असेही ठरावात नमूद करण्यात आले आहे. बिहारमध्ये झालेल्या मतदारांच्या फेरतपासणीच्या मोहिमेवरही ठरावामध्ये तीव्र टीका करण्यात आली आहे. २०२३ मध्ये हैदराबादमध्ये काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यानंतर दोन-तीन महिन्यांमध्ये तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आली. आता बिहारमध्येही पुढील तीन महिन्यांमध्ये महागठबनचे सरकार स्थापन होईल, अशा आशावादही बैठकीत व्यक्त करण्यात आला. मतचोरीचे गैरप्रकार एखाद-दोन मतदारसंघांपुरते सीमित नसल्याने हा मुद्दा काँग्रेस सोडणार नाही, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.
परराष्ट्र धोरणावरही तीव्र चिंता
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही तीव्र चिंता व्यक्त केली गेली. स्वातंत्र्यानंचर पहिल्यांदाच भारताने परराष्ट्र धोरणातील स्वायत्तता गमावली आहे. कधी अमेरिकेची खुशामत करण्यात तर, कधी चीनकडे झुकण्यात परराष्ट्र धोरण लोंबळकत राहिले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने दावा करत आहेत पण, मोदी सरकारला त्यांचा हा दावा थांबवता आलेला नाही. भारतीयांना साखळदंडाने बांधून परत पाठवले गेले पण, मोदी सरकार गप्प राहिलेस्, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.