देशाताली निवडणूक यंत्रणा आधीच मृतवत झाली आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी निवडणूक आयोगावरील हल्ला आणखी तीव्र केला. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही गैरप्रकार झाले होते असा आरोपही राहुल यांनी केला. दिल्लीमधील विज्ञान भवन येथे काँग्रेसतर्फे एकदिवसीय राज्यघटनेसमोरील आव्हाने या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी कमी संख्याबळाने आपल्या पदावर आहेत आणि काही जागांचा फरक पडला असता तर ते त्यांच्या खुर्चीत नसते असा दावा राहुल यांनी केला. यावेळी त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंबंधी काँग्रेसने संकलित केलेल्या डेटाचे उदाहरण दिले. पक्षाने एका मतदारसंघामध्ये ६.५ लाख मतदारांचे छायाचित्र आणि नावे यांची प्रत्यक्ष पडताळणी केली असून त्यामध्ये १.५ लाख मतदार बनावट असल्याचे आढळले, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. “आम्ही हा डेटा प्रसिद्ध करून तेव्हा निवडणूक यंत्रणेत काय घडत आहे याविषयी तुम्हाला धक्का बसणार आहे. हे अक्षरशः अणुबॉम्बसारखे आहे,” असा दावा राहुल गांधी यांनी चर्चासत्रात बोलताना केला. आपल्याकडे या गैरप्रकारांचा १०० टक्के पुरावा आहे असे राहुल म्हणाले. राज्यघटनेचे संरक्षण आणि बचाव करणारी संस्था नष्ट झाली असून ती इतरांनी ताब्यात घेतली आहे अशी टीका त्यांनी निवडणूक आयोगावर केली.
कृपया हे लक्षात घ्या की देशाच्या पंतप्रधानांकडे अगदी थोडक्यात बहुमत आहे. जर १० ते १५ जागांमध्ये गैरप्रकार झाले असले, प्रत्यक्षात हा आकडा ७०-८० ते १०० दरम्यान असावा अशी आमची शंका आहे. (अन्यथा) ते देशाचे पंतप्रधान झाले नसते. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस.
मला राजा व्हायचे नाही
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली असता विज्ञान भवनात उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी “देशाचा राजा कसा असावा, राहुल गांधी यांच्यासारखा असावा,” अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर राहुल यांनी त्यांना शांत व्हायला सांगितले आणि “मला राजा व्हायचे नाही. मी राजाच्या, या संकल्पनेच्या विरोधात आहे,” असे उत्तर दिले.
निवडणूक आयोग मोदींच्या हातातील बाहुले – खरगे
या कार्यक्रमात बोलताना, निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या हातातील बाहुले झाले असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. पंतप्रधान मोदी समाजाची विभागणी करतात आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौनव्रत धारण करतात असे खरगे म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या राज्यात राज्यघटना धोक्यात असून त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक काँग्रेस नेता आणि कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे असे आवाहन त्यांनी केले.
अणुबॉम्बसारखा पुरावा दाखवाच!
पाटणा : राहुल गांधी यांनी मतांच्या चोरीचा अणुबॉम्बसारखा पुरावा दाखवावाच असे आव्हान भाजप नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. पाटण्यामध्ये एका माध्यमसमूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी राजनाथ यांनी राहुल यांना ‘पुराव्यांचा अणुबॉम्ब फोडताना आपण स्वतः जखमी होणार नाही याची काळजी घ्यावी,’ असा खोचक सल्लाही दिला. तसेच राहुल गांधी यांचे संसदेतील ऑपरेशन सिंदूरवरील भाषण फुसका बार होता अशी टीकाही राजनाथ सिंह यांनी केली.