Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने घोषणा केलेली आहे. ६ आणि ११ नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान पार पडणार असून १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि एनडीए व प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षही महत्त्वाचा मानला जात आहे.

यातच या निवडणुकीसाठी एनडीएचं जागा वाटप जवळपास निश्चित झालं आहे, पण महाआघाडीमधील तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाहीये. यातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. झारखंडमध्ये सरकारचं नेतृत्व करणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चाने बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहा जागा लढवण्याची घोषणा ‘झामुमो’ने केली आहे. हेमंत सोरेन यांचा हा निर्णय म्हणजे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाने बिहार विधानसभेच्या निवडणुकीत सहा जागा लढवण्याची घोषणा आहे. तसेच महाआघाडीत निवडणूक लढवण्यासाठी पक्षाला अपेक्षित १२ जागा न मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रवक्त्यांनी सांगितली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, “आम्ही इंडिया आघाडीबरोबर निवडणूक लढणार नाही. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत आहोत. बिहारमधील चकाई, धमदाहा, कटोरिया, पिरपैंती, मनिहारी आणि जमुई या विधानसभा मतदारसंघातून झारखंड मुक्ती मोर्चा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे.”

झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी म्हटलं की, “तेजस्वी यादव यांना आम्ही आम्हाला कोणत्या जागांवर निवडणूक लढवण्याचा मानस आहे याची माहिती दिली होती. मात्र, तरीही त्याबाबत तेजस्वी यादव किंवा राहुल गांधी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आम्ही आता सहा जागा लढवण्याची घोषणा केली आहे.”