अलीकडच्या काही दिवसांपासून देशभरात अदाणी समूहाच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आज ( ७ फेब्रवारी ) लोकसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदाणी प्रकरणावरून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ‘भारत जोडो यात्रे’त चालत असताना तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात सर्व ठिकाणी एकाच नावाची चर्चा होती, ते म्हणजे ‘अदाणी’, ‘अदाणी’, ‘अदाणी’, असं राहुल गांधींनी म्हटलं.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “यात्रेत चालत असताना तरुणांनी विचारलं की, अदाणी यांच्यासारखं स्टार्टअप सुरु करायचं आहे. कारण, अदाणी ज्या व्यवसायाला हात लावतात, तो यशस्वी होतो. लोकं विचारायचं की, अदाणी कसं काय अनेक क्षेत्रांत पुढं जात आहेत. काही वर्षापूर्वी अदाणींचे फक्त एक-दोन व्यवसाय होते. आता, आठ ते दहा व्यवसाय आहेत.”

हेही वाचा : मुंबई विमानतळाचा उल्लेख करत राहुल गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र; म्हणाले, “अदाणी समूहाला…”

“कोणत्याही रस्त्याने चालत जावा, कोणी बांधलं विचारलं, तर अदाणींचं नाव पुढं येत. हिमाचल आणि काश्मीरमधील सफरचंद सुद्धा अदाणींचं आहेत. अदाणी आणि पंतप्रधानांचं संबंध काय आहेत? मी सांगतो, काही वर्षांपूर्वी नरेंद्र मुख्यमंत्री असताना अनेकांनी मोदींचा विरोध केला. पण, तेव्हा अदाणी मोदींच्या बाजूने उभे राहिले.”

“२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खरी जादू सुरु झाली. काही वर्षातच अदाणी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर पोहचले,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

हेही वाचा : अग्निवीर योजनेबाबत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “अजित डोभाल यांनी सैन्यावर…”

“पंतप्रधान मोदींनी पवन उर्जा प्रकल्प अदाणींना…”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेश दौऱ्यावर जातात, काही दिवसानंतरच तेथील वीजेचा मोठा प्रकल्प अदाणींना मिळतो. श्रीलंका वीज मंडळाच्या अध्यक्षांनी २०२२ साली संसदीय समितीला सांगितलं होतं की, पंतप्रधान मोदींनी पवन उर्जा प्रकल्प अदाणींना देण्यासाठी दबाव टाकला होता. हे भारताचे परराष्ट्र धोरण नाही. हे अदाणींच्या व्यवसायाचं धोरण आहे,” अशी टीका राहुल गांधींनी केली.