गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर नपुंसक (नामर्द) असल्याची टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांना घरचा आहेर मिळाला आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी खुर्शिद यांच्या वक्तव्याबाबत कमालीची नाराजी व्यक्त करीत अशा टीकांना आपण फारसे महत्त्व देत नसल्याचे स्पष्ट केले, तसेच अशा टीकाटिप्पणीपासून पक्षाच्या नेत्यांनी स्वतला दूर ठेवावे, असा सल्लाही दिला.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना राहुल म्हणाले की, अशा प्रकारची भाषा अथवा टीकेला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी खुर्शिद यांच्या टीकेचा समाचार घेतला.
२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीला मोदींना जबाबदार धरत त्यांच्यासाठी नपुंसक हाच शब्द योग्य असल्याची टीका खुर्शिद यांनी केली होती. खुर्शिद यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागल्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी डॉक्टर नाही. त्यामुळे मोदींची मी शारीरिक तपासणी केलेली नाही आणि त्यांच्या शारिरीक क्षमतेबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. आपण नपुंसक हा शब्द मोदींच्या राजकीय क्षमतेबाबत वापरला आहे. गुजरात दंगलीची परिस्थिती हाताळण्यास मोदी असमर्थ ठरले हे आपल्याला सांगायचे आहे. मात्र विरोधकांना त्याचा अर्थ समजला नसेल तर त्यांच्यासाठी शब्दकोश पाठवू, असेही खुर्शिद म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते सभ्य भाषा विसरले. कॉंग्रेस पक्षाने खुर्शिद यांना वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागण्यास सांगितले पाहिजे, असे भाजप नेते अरुण जेटली आणि रवि शंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच मणि शंकरअय्यर यांनी मोदींवर केलेल्या चहावाला टीप्पणीबद्दलही राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत कुणावरही वैयक्तिक टीका करू नये, असेही राहुल यांनी सांगितले होते.  
मोदी हे कधीच पंतप्रधान बनणार नाहीत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांना चहा देण्याचे काम मोदी करू शकतात, असे वादग्रस्त वक्तव्य अय्यर यांनी केले होते. त्याची दखल घेत राहुल गांधी यांनी वैयक्तिक पातळीवर टीका करण्याचे टाळावे, असे पक्षाच्या नेत्यांना सांगत घरचा अहेर दिला होता. मात्र तरीही खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत मोदींवर टीका केल्यामुळे राहुल  नाराज झाले आहेत.