Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा होते आहे. याचं कारणही तेवढंच खास आहे. दहा वर्षांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेता सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहे. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी लाल किल्ल्यावरच्या सोहळ्याला येणं हे खास मानलं जातं आहे. मागच्या दहा वर्षांत लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता. आता हे पद राहुल गांधींकडे आलं आहे. त्यानंतर त्यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. दहा वर्षात पहिल्यांदा विरोधी पक्षनेता सोहळ्यासाठी उपस्थित राहुल गांधी ( Rahul Gandhi ) लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले आहेत. मागच्या दहा वर्षांत कुठल्याच पक्षाकडे विरोधी पक्षासाठी आवश्यक असलेल्या खासदारांचं संख्याबळ नव्हतं. कारण २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाकडे एकट्याकडे सर्वाधिक संख्याबळ होतं आणि एनडीएसह भाजपा मिळूनही लोकसभेत त्यांच्याच खासदारांची संख्या जास्त होती. त्यामुळे लोकसभेत विरोधी पक्षनेता नव्हता. यावेळी मात्र तसं चित्र नाही. राहुल गांधींकडे काँग्रेसच्या ९९ खासदारांचं संख्याबळ आहे. तर इंडिया आघाडी काँग्रेस असं मिळून २२८ खासदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदी त्यांची निवड झाली आहे. राहुल गांधींची उपस्थिती ठरली लक्षवेधी राहुल गांधी पांढरा कुर्ता, पायजमा घालून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. त्यांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरली. राहुल गांधी हे मनू भाकेर, सरबजोत सिंग, पी. आर. श्रीजेश या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंसह बसले होते. त्यांनी या सगळ्यांशी थोडासा संवादही साधला. विरोधी पक्षनेत्याने लाल किल्ल्याच्या कार्यक्रमाला येण्याची दहा वर्षांतली ही पहिलीच वेळ होती. लाल किल्ल्यावर येण्याआधी दिल्या शुभेच्छा राहुल गांधींनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. आपल्या सगळ्यांसाठी स्वातंत्र्य हा फक्त एक शब्द नाही तर ते आपलं सुरक्षा कवच आहे. आपल्या घटनेने दिलेला तो अधिकार आहे. लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे या आशयाची पोस्टही राहुल गांधींनी केली. हे पण वाचा- आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न; राहुल गांधी यांचा कोलकात्यातील रुग्णालय प्रशासनावर आरोप मोदींच्या नावे सलग ११ वेळा भाषण करण्याचा रेकॉर्ड भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ११ व्यांदा पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे. तर राहुल गांधी हे या सोहळ्याला उपस्थित राहिल्याने त्याचीही चर्चा होते. या कार्यक्रमानंतर राहुल गांधी हे त्यांची आई सोनिया गांधी तसंच पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेस मुख्यालयात झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमासाठीही उपस्थित होते.