Rahul Gandhi केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रवनीत सिंह बिट्टू यांनी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे देशातले एक नंबरचे दहशतवादी आहेत त्यांच्यावर इनाम ठेवलं पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी शिख समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शिख समुदाय कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही तरीही या समाजात ठिणगी टाकण्याचं काम राहुल गांधींनी केलं आहे. राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी आहेत असं बिट्टू यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी अमेरिकेत शिख समुदायाबाबत जे वक्तव्य केलं त्यानंतर बिट्टू यांनी हे म्हटलं आहे.
काय म्हणाले रवनीत बिट्टू?
“मी आव्हान देतो, जे शिख लोक इथे आहेत त्यांनी सांगावं की शिख समुदाय कुठल्या पक्षाशी जोडला गेला आहे का? भागलपूरमध्ये त्यांना (राहुल गांधी) कुणीतरी सांगितलं आम्ही पगडी घालू शकत नाही, कडं वापरु शकत नाही. कुणी सांगितलं हे? कोण म्हणतंय गुरुद्वारामध्ये आम्हाला जाता येत नाही? मला एका शिख बांधवाने सांगावं मी भाजपा सोडून देईन. भांडणं लावण्यासाठी आधी मुस्लीम समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. आता शिख समुदायांत भांडणं लावण्याचा प्रयत्न होतो आहे. शिख समुदायात फूट पाडण्याचं काम सुरु आहे. शिख बांधव देशाच्या सीमेवर उभे राहून सीमेचं रक्षण करतात. अशा समुदायात फूट पाडण्याचं काम सुरु आहे.” असा आरोप बिट्टू यांनी केला आहे.
बिट्टू यांनी आणखी काय म्हटलं आहे?
बिट्टू पुढे म्हणाले, “देशातले वाँटेड गुन्हेगार किंवा दहशतवादी जशी भाषा करतो तशीच भाषा राहुल गांधींच्या तोंडी आहे. राहुल गांधी एरवीही अशीच वक्तव्यं करतात. जे बॉम्ब हल्ले करतात, शस्त्रधारी दहशतवादी असतात अशा फुटीरतावाद्यांना आणि दहशतवाद्यांना राहुल गांधींचं कौतुक वाटतं आहे कारण राहुल गांधी त्यांच्याच भाषेत बोलले आहेत. राहुल गांधी हे नंबर वन दहशतवादी आहेत त्यांच्यावर बक्षीस ठेवलं पाहिजे.” असं राहुल गांधींबाबत ( Rahul Gandhi ) बिट्टू यांनी म्हटलं आहे. भागलपूर या ठिकाणी बिट्टू यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राहुल गांधींना भारताविषयी प्रेम नाही
बिट्टू यांना एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावर बिट्टू म्हणाले राहुल गांधी हे असे पहिले भारतीय आहेत ज्यांनी देशापेक्षा जास्त काळ देशाबाहेर घालवला आहे. तिकडे त्यांचे मित्र आहेत, त्यांचं कुटुंब आहे. त्यामुळे माझं हे स्पष्ट मत आहे की राहुल गांधींना देशावर प्रेम नाही. विदेशात जाऊन भारताबाबत प्रत्येक उलट गोष्ट बोलतात. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. बाहेर जाऊन फोटो काढतात आणि त्यांची खिल्ली उडवली जाते अशी बोचरी टीका बिट्टू यांनी केली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.