भूकंप करण्याचा इशारा देणाऱ्या राहुल यांना मोदींचे ‘आवतण’
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिगत भ्रष्टाचाराचे सबळ पुरावे असल्याची गर्जना करून तीन दिवस उलटले तरी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अद्याप ‘भूकंप’ घडविला नाही. मात्र, ते आश्चर्यकारकरीत्या काँग्रेसच्या शिष्टमंडळासह मोदींना भेटायला गेल्याने शुक्रवारी राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या.
लोकसभेत बोलू दिले तर मोदींविरुद्धच्या पुराव्यांनी भूकंप घडविण्याचा इशारा दिल्यापासून राहुल यांच्या भात्यातील अस्त्राकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. शुक्रवारी संसदेचे अधिवेशन संपल्याने आता ते संसदेबाहेर आरोपांची घोषणा करणार असल्याचे सांगितले जात असताना राहुल हे सकाळीच मोदींना भेटायला गेले. सोबत मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते होते. निमित्त होते नोटाबंदीतून जमलेल्या पैशांतून शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याच्या मागणीचे. मध्यंतरी राहुल यांनी ‘देवरिया ते दिल्ली’ किसान अभियान केले होते. काँग्रेसने उत्तर प्रदेशातील दोन कोटी शेतकऱ्यांकडून कर्जे माफ करण्याची मागणी करणारी पत्रं लिहून घेतली आहेत. त्याच्या अनुषंगाने ही भेट होती. पण या भेटीने भुवया उंचावल्या. या वेळी मोदींनी राहुल यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मात्र, जाताना ते राहुलना म्हणाले, ‘अधूनमधून भेटत जा..’
दरम्यान, अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भेटले. नोटाबंदीचा विरोध आणि संसद चालू न दिल्याबद्दल सरकारवर खापर फोडणारे निवेदन या वेळी त्यांना देण्यात आले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काही विरोधी पक्ष नेते होते. पण समाजवादी पक्ष, बसपा, डावे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सहभागी होण्याचे टाळले. ममता बॅनर्जी यांच्याबरोबरच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शिवसेनेनेही काँग्रेसबरोबर जाण्यास नकार दिला.
‘मोदींविरोधात बोलण्याचे धाडस नाही..’
राहुल यांनी मोदींविरुद्धचे आरोप उघड करण्याचे शुक्रवारीही टाळल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिमटे घेतले. ‘मोदींविरुद्ध बोलण्याचे धाडसच राहुल यांच्याकडे नाही. ज्या क्षणी राहुल तसे करतील, त्या क्षणी रॉबर्ट वडेरांना अटक होईल,’ असे केजरीवाल म्हणाले.
माध्यमांमुळे महाराष्ट्र केसरी प्रवेशद्वारावर अडकला
सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या विजय चौधरीचा विधिमंडळातील दोन्ही सभागृहांत शुक्रवारी अभिनंदन प्रस्तावातून गौरव करण्यात आला. या प्रसंगी विजयही उपस्थित होता. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व विविध मंत्र्यांसह प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनीही त्याच्यासोबत परिसरात सेल्फी काढली. इलेक्ट्रॉनिक प्रसिद्धी माध्यमांना त्याची प्रतिक्रिया हवी होती. ती नियमाने परिसरात घेता येत नसल्याने त्याला बाहेर नेणे आवश्यक होते, परंतु विजयकडे परिसरात प्रवेश पास नव्हता. प्रसिद्धी माध्यमांनी त्याला पुन्हा आत प्रवेश मिळवून देण्याची हमी देत मागच्या द्वाराने बाहेर नेऊन बाइट घेतले. पुन्हा विधिमंडळ परिसरात येत असताना सुरक्षा यंत्रणांनी त्यांना प्रवेशद्वारावर अडवले. प्रसिद्धी माध्यमांनी त्याचा परिचय करून दिल्यावरही त्याला सुरक्षा यंत्रणेने प्रवेश दिला नाही. जवानांनी त्याला समोरच्या प्रवेशद्वारावरून जाण्याचा सल्ला दिला. सुरक्षा यंत्रणेची चूक नसली तरी या घटनेने दोन्ही सभागृहांत गौरव करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींमुळे प्रवेशद्वारावर अडकला.
******
सत्ताधारीही पायऱ्यांवर
उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून नागपुरात ग्रामीण भागातील भाजपचे एकही आमदार विविध मागण्यांकरिता विधिमंडळाच्या पायरीवर आले नसल्याचे प्रथमच चित्र निर्माण झाले. नागरिकांच्या मनात या प्रकारामुळे जिल्ह्य़ातील सगळ्याच समस्या सुटल्या काय, हा विचार सुरू झाला होता, परंतु शुक्रवारी भाजपचे रामटेक मतदारसंघातील आमदार मल्लिकार्जुन रेड्डी हे धानाला ५०० रुपये बोनस देण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता विधान भवनाच्या पायरीवर आले. या घटनेमुळे भाजपचे नागपूर जिल्ह्य़ातील सत्ताधारीही पायऱ्यांवर उतरल्याचा अनुभव सगळ्यांना आला, परंतु शहरातील एकाही आमदाराने अद्याप एकाही मागणीकरिता पायऱ्यांवर आंदोलन केले नाही, हे विशेष.
प्रतिनिधी