India Pakistan Tension : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तणाव निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. तसेच पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर कधीही कारवाई करू शकतं, या भितीने पाकिस्तानची चलबिचल वाढली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. भारत सरकारच्या दिल्लीत बैठकांवर बैठका सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी भारताच्या हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भारताच्या नौदल प्रमुखांनी देखील पंतप्रधानांची भेट घेत घेतली होती. एवढंच नाही तर काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यामुळे या बैठकांमध्ये काय चर्चा होतेय? याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत.

यातच आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत पहलगाम हल्ल्याबाबत एक महत्वाची मागणी भारत सरकारकडे केली आहे. पहलगाम हल्ल्यातील दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कोणीही भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्चा दुःख सहभागी होत त्यांचं सांत्वन केलं. प्रचंड दुःखाच्या वेळीही त्यांचं धाडस आणि शौर्य राष्ट्रासाठी एक संदेश आहे की आपली एकजूट राहिली पाहिजे. संपूर्ण देश शहीदांच्या कुटुंबियांसोबत उभा आहे. सरकारला विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा आहे. दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की कोणीही भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही. आज संपूर्ण देश पीडित कुटुंबांसह न्यायाची वाट पाहत आहे”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.