सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाचा आर्थिक आधार असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवींवर ८.१ टक्के व्याजदरावर केंद्र सरकारने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. गेल्यावर्षी दिल्या गेलेल्या ८.५ टक्क्यांच्या तुलनेत मोठ्या कपातीसह हा सरकारने मंजूर केलेला ४० वर्षांतील सर्वात कमी व्याजाचा दर आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असलेल्या पाच कोटींहून अधिक पगारदारांना महागाईच्या काळात दिलेला हा मोठा धक्काच आहे. त्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वरील व्याजदर ८.१ टक्क्यांपर्यंत आणल्याबद्दल निशाणा साधला. लोक कल्याण मार्ग पत्ता (पंतप्रधान निवास) ठेवून लोकांचे कल्याण होत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांची खिल्ली उडवत राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केले आहे. “घराचा पत्ता ‘लोक कल्याण मार्ग’ ठेवल्याने लोकांचे भले होत नाही. साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘महागाई वाढवा, कमाई कमी करा’ हे मॉडेल लागू केले आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी एक आलेख देखील शेअर केला, जो २०१५-१६ मध्ये ईपीएफ वर ८.८ टक्के व्याजदर होता, जो आता ८.१ टक्क्यांवर आला आहे.

चालू वर्षांच्या सुरुवातीला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या पीएफ अंशदानावर २०२१-२२ साठी व्याजाचा दर ८.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर त्यावेळी बरीच टीकाही झाली होती. मात्र तरी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे संमतीसाठी पाठवला. त्याला मंजुरी देताना प्रत्येक ईपीएफ खात्यात २०२१-२२ साठी ८.१ टक्के व्याजदर जमा करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे शुक्रवारी ईपीएफओ कार्यालयाने आदेशाद्वारे स्पष्ट केले.

केंद्र सरकारने व्याजदराला मान्यता दिल्यानंतर, सरलेल्या २०२१-२२ आर्थिक वर्षांसाठी ८.१ टक्के दराने व्याजदर ईपीएफ खात्यांमध्ये जमा करण्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून सुरुवात केली जाईल.

गेल्या ८ वर्षांत गरिबी कमी झाली – भाजपा</strong>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मोदी सरकारच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात सरकारने गरिबी कमी केल्याचा दावा केला आहे. पूर्वी देशातील २२ टक्के लोकसंख्या गरीब असायची, पण आता ८ वर्षांनंतर हा आकडा केवळ १० टक्क्यांवर आला आहे. शाहनवाज हुसेन पुढे म्हणाले, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मार्गावर आम्ही देशाला पुढे नेत आहोत. आमची सेवा ही संस्था आहे, आम्ही या कामात गुंतलो आहोत.