पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज ओबीसी समाजाबद्दल बोलतात. पण, ओबीसी समाजाबद्दल पंतप्रधान मोदींनी काय केलं? असा सवाल काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. देशात पाच टक्के ओबीसी समाज आहे, हे मान्य करू. पण, पाच टक्क्यांहून अधिक ओबीसी समाज असेल, तर तो किती आहे, हे कळलं पाहिजे. आणि मी एखादी गोष्ट ठरवली, तर केल्याशिवाय सोडत नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी भाजपाला दिला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मोदी ओबीसी समाजासाठी खूप काही केल्याचं सांगतात. पंतप्रधान एवढं काम करतात, तर ९० मधील फक्त ३ सचिव ओबीसी समाजातून का आहेत? भारतातील ५ टक्के अर्थकारण ओबीसी समाजाच्या हातात आहे." "पंतप्रधान दररोज ओबीसींबद्दल बोलतात. पण, ओबीसींसाठी काय केलं? हे बोलल्यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया मजेशीर होती. 'पंतप्रधान म्हणतात, लोकसभेत ओबीसी प्रतिनिधित्व करणारे आमची लोक आहेत.' लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याचा काय संबंध आहे? ५ टक्के ओबीसी समाज अर्थकारणाबाबत निर्णय घेत आहे. भारतात ओबीसी समाज फक्त ५ टक्के आहे का? याची माहिती आम्हाला पाहिजे." "भारतात ५ टक्के ओबीसी समाज आहे, हे मान्य करू. पण, पाच टक्क्यांहून अधिक ओबीसी समाज असेल, तर तो किती आहे, याची माहिती मिळाली पाहिजे. आणि मी एखादी गोष्ट ठरवली, तर ती केल्याशिवाय सोडत नाही," असं राहुल गांधी यांनी म्हटलं.