Bharat Jodo Yatra 2 : कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रेची सांगता झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू होणार आहे. मणिपूर ते मुंबई अशी ही पदयात्रा असणार असून भारत न्याय यात्रा असं याचं नाव आहे. ही पदयात्रा ईशान्येतील मणिपूरपासून सुरू होऊन देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे मुंबईत जाणार आहे.

राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेत १४ राज्यांमधील तब्बल ८५ जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. हा मोर्चा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात असा ६ हजार २०० किलोमीटरचा प्रवास करेल. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे १४ जानेवारीला मणिपूरमधून या यात्रेला सुरुवात करतील. भारत जोडो यात्रेने ४ हजार ५०० किलोमीटर प्रवास केला होता.

या यात्रेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा याकरता बसची सुविधा करण्यात आली आहे. तसंच, पायी पदयात्राही होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या आणि उत्तरेकडील काश्मीरमध्ये संपलेल्या भारत जोडो यात्रेला त्यांनी “ऐतिहासिक यात्रा” म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत जोडो यात्रेतून अनुभव घेत राहुल गांधी आता तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणार आहेत, असं केसी वेणुगोपाल म्हणाले. भारत न्याय यात्रेची घोषणा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आली आहे, ज्यामध्ये काँग्रेस आणि त्याचे भारत ब्लॉक सदस्य भाजपचा पाडाव करण्याच्या प्रयत्नात आहेत.