Smriti Irani in Monsoon Session 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी परत मिळाली असून ते आज लोकसभेतही परतले आहेत. त्यांच्या पहिल्याच भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक प्रहार केले. मी आज अदानी विषयावर बोलणार नाही, असं सांगत त्यांनी मणिपूरप्रश्नी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. दरम्यान, सभागृहात लांबलचक भाषण करून झाल्यावर राहुल गांधींनी सभागृह सोडले. यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रचंड संतापल्या असून राहुल गांधींना त्यांनी स्त्रीद्वेष्टा संबोधलं आहे.
अविश्वास प्रस्तावावर भाषण दिल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभा सभागृह सोडले. यावेळी राहुल गांधी यांच्या हातून काही फायली पडल्या. या फायली उचलण्याकरता राहुल गांधी खाली वाकले, तेव्हा भाजपाचे काही खासदार त्यांच्यावर हसले, असं इंडिया टुडेने म्हटलं आहे. भाजपा खासदारांच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून राहुल गांधींनी या खासदारांना फ्लाइंग किस दिलं. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला नसला तरीही काही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
हेही वाचा >> Monsoon Session: “जर गांधी खानदानात हिंमत असेल, तर…”, स्मृती इराणींचं राहुल गांधींवर टीकास्र!
दरम्यान, यावरून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला. “राहुल गांधी यांनी जाता जाता अभद्र कृतीचं दर्शन घडवलं. फक्त एक स्त्रीद्वेष्टा पुरुषच संसदेत महिला खासदारांना फाइंग किस देऊ शकतो. अशा प्रकारची कृती लोकसभेत कधीच घडली नव्हती. हे त्यांच्या कुटुंबाचे संस्कार आहेत हे आज देशाला माहित पडले. ते काय विचार करतात हे या कृतीतून दिसून आले आहे”, असं स्मृती इराणी म्हणाल्या. राहुल गांधी यांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तवाच्या भाषणाला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
स्मृती इराणी यांनी लोकसभेच्या बाहेरही प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “राहुल गांधी यांनी आज संसेदत जे काही केले त्यासारखे वाईट वर्तन याआधी कधीच झाले नव्हते. लोकसभेत महिलांच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी कायदे केले जातात, परंतु, येथे लोकसभेतील सत्रादरम्यान राहुल गांधी यांच्याकडून दष्कृत्य केलं गेलं. त्यांना परत लोकसभेत आणलं पाहिजे का? असा माझा प्रश्न आहे.जे लोक कायद्याचं उल्लंघन करतात, वाईट इशारे करतात. हे माहित नव्हतं की गांधी कुटुंबात असेही संस्कार आहेत”, अशी टीका त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केली.
राहुल गांधी यांची सभागृहात तुफान बॅटिंग
“काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो. आमचे पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्थान नाही. मी मणिपूर शब्दाचा वापर केला. पण आज मणिपूर वाचलेलं नाही. मणिपूरला तुम्ही दोन भागांमध्ये वाटलं आहे. मी मणिपूरच्या रिलीफ कॅम्पमध्ये गेलो. तिथे महिलांशी बोललो. मुलांशी बोललो. जे आपल्या पंतप्रधानांनी आजपर्यंत केलं नाही. एका महिलेला मी विचारलं, तुमच्याबरोबर काय झालं? तर एक महिला म्हणाली, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलाला गोळी मारली गेली. मी रात्रभर त्याच्या प्रेताबरोबर झोपले होते”, असं राहुल गांधी म्हणाले.
स्मृती इराणींचा प्रत्युत्तर
“हे म्हणतात मणिपूरवर चर्चा करा. देशाचे गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह यांनीही सांगितलं की चर्चा करा, आम्ही तयार आहोत. पण हे पळून गेले. आम्ही नव्हतो पळून गेलो. कारण काय? कारण गृहमंत्री जेव्हा बोलायला लागतील, तेव्हा यांना गप्प बसावं लागेल”, असं त्या म्हणाल्या. “हे म्हणतात आम्ही मंत्र्यांशी बोलणार नाही. कारण मंत्र्यांच्या कार्यशैलीवर त्यांना बोलायचं नाही. बरोबर आहे. कारण त्यांचा स्वत:चा अनुभव आहे की त्यांच्याकडे शक्तीचा केंद्रबिंदू एकच होता. इथे आम्ही सगळे एकत्र जबाबदारी घेतो”, असा टोलाही इराणी यांनी लगावला.