महिलांविरुद्धच्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तातडीने न्याय मिळण्याची मागणी जोर धरत आह़े  अशा वेळी राजस्थानमध्ये भारतीय पोलीस सेवेतील काही अधिकाऱ्यांनी बलात्काराच्या खटल्यातील आरोपींवर अत्यंत कमी वेळेत आरोपपत्र दाखल करून देशापुढे आदर्श घालून दिला आह़े
राजस्थानातील बारमेर पोलिसांनी आठ दिवसात, बुंदी आणि सिरोही येथील पोलिसांनी अनुक्रमे अवघ्या ३ आणि ४ दिवसांत बलात्कार प्रकरणांत आरोपपत्र दाखल केल़े  विशेष म्हणजे बुंदी आणि सिरोही या ठिकाणची प्रकरणे तडीस लावणाऱ्या दोन्ही अधिकारी महिला आहेत़
बुंदी येथील श्यामसुंदर नावाच्या कामगाराने तेरावर्षीय मुलीवर तिच्याच घरात सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप आह़े  हे प्रकरण ४ जानेवारी रोजी उघडकीस आले होत़े  त्यानंतर फरार झालेल्या आरोपीला बुंदीच्या पोलीस अधीक्षक प्रीती चंद्रा यांनी तातडीने कारवाई करीत आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर आरोपपत्र दाखल केल़े  या खटल्याला प्राधान्य देण्यात आले होत़े  हा खटला तपासासाठी महिला अधिकाऱ्याकडेच देण्यात आला होता़  तसेच आता हे प्रकरणातील न्यायाधीशही महिलाच आहेत़  त्यामुळे सर्वच गोष्टी वेगाने होतील, असा विश्वास प्रीती यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला़  या प्रकरणात ७ जानेवारीला म्हणजे तीनच दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आल़े  हे करण्यामागे विक्रम करण्याचा नव्हे, तर नागरिकांमध्ये व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण करण्याचा हेतू होता, असेही प्रीती पुढे म्हणाल्या़
याच मताचा पुनरुच्चार करीत सिरोहीच्या पोलीस अधीक्षक लव्हली कटियारा म्हणाल्या की, नकारात्मक विचारांनी घेरलेल्या लोकांपुढे चांगले उदाहरण घालून देण्यासाठीच आम्हीही अशाच एका प्रकरणात केवळ ९५ तासांत आरोपपत्र दाखल केले आह़े  सिरोही येथील ५० वर्षीय जग्या याने एका महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण ३१ डिसेंबर रोजी उघडकीस आले होत़े  त्यानंतर ४ जानेवारी रोजी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल़े
बारमेर पोलिसांनीही मनोहर, नरेंद्र आणि शेरा रात या तीन आरोपींविरोधात ३ जानेवारी रोजी आठ दिवसांत आरोपपत्र दाखल केल़े  त्याच्यावर डिसेंबर २०१२ मध्ये १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आह़े  बलात्कार प्रकरणात आठ दिवसांत आरोपपत्र दाखल होण्याचे बारमेरमधील हे पहिलेच प्रकरण आहे, असा दावा पोलीस अधीक्षक राहुल बऱ्हाट यांनी केला आह़े