राजस्थानमध्ये लष्कराचे गणवेश विकणाऱ्या एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय आहे. आनंदराज सिंग (वय २२) असे या व्यक्तीचे नाव असून तो राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची महिती समोर आली आहे. लष्कराचे गणवेश विकण्याचा व्यवसाय तो करत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
सोशल मीडियाद्वारे शेअर करायचा माहिती
राजस्थानच्या गंगानगर जिल्ह्यातील सूरतगड आर्मी कॅन्टोन्मेंटच्याबाहेर आनंदराज सिंग गणवेशाचे दुकान चालवतो. मात्र, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या तीन महिलांच्या सतत संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्याने लष्करासंदर्भातील महत्त्वाची माहिती गोळा करून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या तीन महिलांना दिल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी या व्यक्तीला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात करण्यात आलं दाखल
हेरगिरीसंदर्भात पोलीसांनी काय माहिती दिली?
अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) संजय अग्रवाल यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले, “आनंद राज सिंग (वय २२) हा सूरतगड आर्मी कॅन्टोन्मेंटच्या बाहेर गणवेशाचे दुकान चालवत असे. मात्र, काही दिवसांपासून तो आपले दुकान बंद करून बाहेर एका कारखान्यात कामाला होता. या काळात तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांशी संबधित महिलांच्या संपर्कात आला होता. आनंदराज सिंग हा त्याच्या स्रोतांकडून लष्कराची गोपनीय माहिती मिळवायचा. यानंतर ती माहिती पाकिस्तानच्या गुप्तहेरांना सांगायचा. याबरोबरच अशी गोपनीय माहिती पाठवण्यासाठी आरोपीने पैशांची मागणीही केली होती”, असे संजय अग्रवाल यांनी सांगितले.
दरम्यान, अशा प्रकारच्या हेरगिरीच्या कारवायांवर राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) संजय अग्रवाल यांनी सांगितले. “आनंदराज सिंग या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांच्या संयुक्त चौकशीतून तांत्रिक माहिती मिळवण्यात आली. यानंतर त्याने वापरलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली”, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.