Made by India in Morocco : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतच देशाला संबोधित करताना देशवाशियांना अतिशय महत्वाचं आवाहन केलं. देशाच्या जनतेला स्वदेशीचा नारा दिला आहे. स्वदेशी वस्तू खरेदी करा, स्वदेशी वस्तूंची विक्री करा असं आवाहन त्यांनी केलं. याच मुद्यांच्या अनुषंगाने आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते टाटा मोटर्सच्या लष्करी वाहन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन पार पडलं आहे.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मोरोक्कोचे अब्देलतिफ लौदी हे उपस्थित होते. मंगळवारी मोरोक्कोच्या बेरेचिड या ठिकाणी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) च्या अत्याधुनिक लढाऊ वाहन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन पार पडलं आहे. २०,००० चौरस मीटरच्या या प्रकल्पात टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड आणि भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) संयुक्तपणे डिझाइन केलेले स्वदेशी विकसित व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म (WhAP) ८×८ तयार करण्यात येणार आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, राजनाथ सिंह यांनी हा प्रसंग भारत आणि मोरोक्कोमधील विकसित होत असलेल्या धोरणात्मक भागीदारीतील एक ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे. तसेच निवेदनात नमूद केलं की व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्म (WhAP) हे एक आधुनिक मॉड्यूलर लढाऊ प्लॅटफॉर्म असणार आहे. जे प्रगत आणि गतिशीलता व संरक्षण आणि मिशन अनुकूलतेसह सुसज्ज असेल.

राजनाथ सिंह यांनी काय म्हटलं?

“माझे मित्र अब्देलतिफ लौदी यांच्याबरोबर बेरेचिड येथे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे. भारतासाठी, स्वावलंबन म्हणजे वेगळेपणा नाही, तर आत्मनिर्भरता या अंतर्गत धोरणात्मक स्वायत्तता विकसित करण्याचं आमचं ध्येय आहे. त्यामुळे आम्हाला अशा क्षमता विकसित करायच्या आहेत, ज्या आम्हाला जागतिक भागीदारांशी संबंध राखून स्वतंत्रपणे आमच्या राष्ट्राचं रक्षण करण्यास अनुमती देतील. ‘मेक इन इंडिया’ बरोबरच आम्ही ‘मेक विथ फ्रेंड्स’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ देखील करत आहोत. मोरोक्कोमधील ही सुविधा त्या दृष्टिकोनाचं एक ज्वलंत उदाहरण आहे.”