India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाच्या दुसऱ्या दिवशी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलांची ताकद रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात जाणवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर काही वेळातच लखनौमधील उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमधील ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात राजनाथ सिंह व्हर्च्युअल पद्धतीने बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की भारत सीमेच्या दोन्ही बाजूंनी दहशतवादाविरुद्ध प्रभावी कारवाई करेल.”
चार दिवसांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबार आणि ड्रोन क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानने शस्त्रविरामावर सहमती दर्शविल्यानंतर दुसऱ्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख अनिल चौहान आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीला उपस्थित होते.
ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, “पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. परंतु पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी भागांना लक्ष्य केले नाही तर मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.”
राजनाथ सिंह म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. ही कारवाई दहशतवादाविरुद्ध भारताच्या दृढ इच्छाशक्तीचे, लष्करी सामर्थ्याच्या क्षमतेचे आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन आहे. आम्ही दाखवून दिले आहे की जेव्हा जेव्हा भारत दहशतवादाविरुद्ध कोणतीही कारवाई करेल तेव्हा सीमेपलीकडील जमीन देखील दहशतवाद्यांसाठी आणि त्यांना पोसणाऱ्यांसाठी सुरक्षित राहणार नाही.”
संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय सैन्याने धैर्य आणि शौर्य तसेच संयम दाखवत अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला करून योग्य प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आपण केवळ सीमेजवळ असलेल्या लष्करी तळांवर कारवाई केली नाही तर याची ताकद पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत जाणवली आहे.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी भारत-पाकिस्तानमधील लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक स्तरावरील चर्चेनंतर, दोन्ही देशांनी शस्त्रविरामास सहमती दर्शविली होती. काल सकाळी पाकिस्तानी सैन्य भारतीय नागरिक आणि लष्करी तळांना सतत लक्ष्य करत होते. प्रत्युत्तराच्या हल्ल्यात, भारतीय सशस्त्र दलांनी त्यांच्या शस्त्रागारात उपलब्ध असलेल्या अधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्रे आणि आत्मघाती ड्रोन्स यासारख्या शस्त्रांचा वापर केला आहे.