Rajnath Singh on Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या मालावर ५० टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारत सरारकडून यावर लगेचच कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही, असे का? याबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केले आहे. आपला देशाचे विचार आणि हृदय मोठे असल्याचे सिंह म्हणाले आहेत.
मोरोक्को येथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी यासंबंधी भाष्य केले आहे. ते म्हणाले की , “आम्ही प्रतिक्रिया दिली नाही…. ज्यांचे विचार मोठे असतात, मन मोठे असते ते कोणत्याही घटनेवर लगेचच प्रतिक्रिया देत नाहीत.”
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे, ज्यापैकी २५ टक्के टॅरिफ हा रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याने लादण्यात आला आहे.
पीओके बद्दल संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
भारताचे संरक्षणमंत्री हे सध्या मोरोक्कोच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्याने यावेळी कोणतेही आक्रमक पाऊल न उचलता पाकिस्तान व्याप्त काश्मीरचा ताबा पुन्हा भारताला मिळेल याबद्दल देखील विश्वास व्यक्त केला. सध्याच्या राजवटीतून लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत, असे राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षणमंत्री म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल. त्या भागात राहणाऱ्या लोकांमधून आता तशी मागणी होत आहे. तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या घोषणा ऐकल्या असतील. पाच वर्षांपूर्वी मी भारतीय लष्कराच्या एका कार्यक्रमासाठी काश्मीर खोऱ्यात गेलो होतो. त्या कार्यक्रमावेळी भाषण करत असताना मी म्हटलं होतं की पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून त्यावर ताबा मिळवण्याची गरज नाही. मुळात तो भाग आपलाच आहे आणि तो लवकरच भारतात समाविष्ट होईल. एक दिवस पीओके स्वतःच म्हणेल, मी सुद्धा भारत आहे. तो दिवस फार दूर नाही.”
७ मे रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पीओके ताब्यात घेण्याची संधी गमावली असा आरोप झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी हे विधान केले आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने अनेक पाकिस्तानी विमाने पाडल्यानंतर भारताची बाजू मजबूत असतानाही शस्त्रविराम करण्यावर सहमती दाखवण्यात आली, यावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका केली गेली होती. तसेच ही पीओके ताब्यात घेण्याची संधी होती असेही विरोधकांनी म्हटले होते.
