Rajnath Singh जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २ २ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना धर्म विचारुन ठार करण्यात आलं. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. भारताची किती विमानं पडली हे विचारणाऱ्या विरोधकांना राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं.

ऑपरेशन सिंदूर का राबवण्यात आलं?

ऑपरेशन सिंदूर राबवण्याचं कारणच हे होतं की पाकिस्तानने ज्यांना पोसलं आहे त्या दहशतवाद्यांना उत्तर देणं आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करणं. तसंच पहलगाम मध्ये निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली त्याचं हे उत्तर होतं. दहशतवादी पाठवून प्रॉक्सी वॉर करणाऱ्या पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनचा उद्देश युद्ध करणं हा नव्हता. १० मे च्या सकाळी भारतीय वायुसेने पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने हार मानली आणि ते गुडघ्यावर आले. त्यांनी आपल्या डीजीएमओंशी संपर्क केला आणि हे सगळे हल्ले थांबवा अशी विनंती केली.

पाकिस्तान विरोधातली कारवाई का थांबवली?

१० मे च्या सकाळी पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला केला तेव्हा पाकिस्तान गुडघ्यांवर आला. आता तरी हे हल्ले थांबवा अशी याचना आपल्या देशाकडे केली. त्यावेळी आम्ही पाकिस्तानला बजावलं की आम्ही ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं आहे. पाकिस्तानने यापुढे चुकूनही कुठलीही आगळीक केली तर त्यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गतच उत्तर दिलं जाईल असं आपण त्यांना ठणकावून सांगितलं. भारतीय वायुसेनेचे हल्ले, नियंत्रण रेषेवरची लष्कराची कारवाई आणि नौदलाची अचूक कारवाई यामुळे पाकिस्तानला पराभव मान्य करावा लागला. पाकिस्तानचा पराभव साधासुधा नव्हता. पाकिस्तानचं सैन्यबलही हरलं आणि त्यांचं मनोबलही ते हरवून बसले. पाकिस्तानच्या डीजीएमओंनी आपल्या डीजीएमओंनी कारवाई थांबवा, हल्ले थांबवा अशी याचना केली. त्यानंतर शस्त्रविराम करण्यात आला. आपल्या सैन्याचं शौर्य १४० कोटी भारतीयांनी पाहिलं. ऑपरेशन सिंदूर का सुरु केलं गेलं याची माहिती आधीही दिली गेली, आजही दिलं आहे.

विरोधक विचारतात भारताची किती विमानं पडली ते सांगा, हा राष्ट्रीय जनभावनेचा अनादर-राजनाथ सिंह

आजही आपले विरोधक विचारतात पाकिस्तानने भारताची किती विमानं पाडली ते सांगा. मला वाटतं राष्ट्रीय जनभावनेचा हा अनादार आहे. कारण त्यांनी एकदाही आम्हाला हे विचारलं नाही की आपल्या सैन्य दलांनी पाकिस्तानची किती विमानं पाडली? मी विरोधकांना हे सांगू इच्छितो की त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी हे जरुर विचारावं की भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले का? तर त्याचं उत्तर आहे हो. मी विरोधी पक्षाच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर हा विचारा की ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का? तर त्याचं उत्तर आहे होय, ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर हा विचारा की ज्या दहशतवाद्यांनी आपल्या भगिनींचं कुंकू पुसलं त्यांच्या आकांना, म्होरक्यांना ठार करण्याचं काम आपण केलं का? तर त्याचं उत्तर आहे होय. प्रश्न विचारायचा असेल तर हा विचारा की ऑपरेशन सिंदूर मध्ये आपले जवान जखमी झाले का? तर त्याचं उत्तर आहे नाही. जेव्हा लक्ष्य मोठं असतं तेव्हा छोट्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरबाबत चुकीचे प्रश्न विचारत असतील तर मी त्यांना काय उत्तर देऊ? मी चार दशकं राजकारणात आहे. मी शत्रुता पूर्ण राजनीती कधीही पाहिलेली नाही असंही राजनाथ सिंह म्हणाले आणि काँग्रेसला टोला लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही विरोधी पक्षात असताना असे प्रश्न विचारले नाहीत-राजनाथ सिंह

आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा विरोधी पक्षाची भूमिका आम्ही सकारात्मकपणे राबवली. १९६२ मध्ये चीनशी झालेल्या युद्धानंतर आम्ही हा प्रश्न विचारला की दुसऱ्या देशाने आपल्या देशावर कब्जा कसा केला? आपली सेना आणि जनता अपमानित कशी झाली. आपले रणगाडे, बंदुका, तोफा किती उद्ध्वस्त झाल्या हे प्रश्न आम्ही उपस्थित केले नाहीत. कारण आमच्यासाठी देशाच्या सीमांचं रक्षण हा मुद्दा महत्त्वाचा होता. १९७१ च्या युद्धात आपण पाकिस्तानला धडा शिकवला तेव्हा कुठल्या पक्षाचं सरकार आहे हे आम्ही पाहिलं नाही. आमचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी देशाच्या नेतृत्वाचं कौतुक केलं होतं. भारताची किती विमानं पाडली गेली हा प्रश्न आम्ही तेव्हाही विचारला नाही. कुठल्याही परीक्षेत निकाल महत्त्वाचा असतो. एखादा विद्यार्थी परीक्षा पास होतो तेव्हा आपल्याला त्याचा निकाल काय लागला ते पाहिलं पाहिजे तुझी पेन्सिल तुटली होती का? पेन हरवलं होतं का? हे प्रश्न निरर्थक ठरतात असं म्हणत राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या प्रश्नांची खिल्ली उडवली. ऑपरेशन सिंदूरचा निकाल हा आहे की जे लक्ष्य आपण निश्चित केलं होतं ते लक्ष्य आपण गाठलं असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.