Rajnath Singh to Pakistan: ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कराने केलेल्या अतुलनीय कामगिरीचे कौतुक करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या विविध लष्करी तळांना भेटी देत आहेत. काल जम्मू-काश्मीरचा दौरा केल्यानंतर त्यांनी आज भुज येथील हवाई दलाच्या रुद्र माता तळाला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर संपले नसल्याचे आणि हा फक्त ट्रेलर होता, असे सांगून पाकिस्तानला इशारा दिला.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. हा फक्त ट्रेलर होता. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा जगाला आम्ही संपूर्ण चित्रपट दाखवू. तसेच पाकिस्तानला भारताने प्रोबेशन पिरियडवर ठेवले आहे. जर त्यांनी पुढील काळात आपली वर्तनूक सुधारली तर ठिक आहे. नाहीतर त्यांना पुन्हा धडा शिकवला जाईल.”
शांततेसाठी भारत हा नेहमीच आग्रही राहिला आहे. भारत जगात नम्रतेसाठी ओळखला जातो. पण जर कुणी आमच्या शांततेला नख लावायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही जशास तसे उत्तर देतो, हेही जगाने आता पाहिले, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
आयएमएफने पाकिस्तानला कर्ज देऊ नये
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरही भारताने कडाडून टिका केली. राजनाथ सिंह म्हणाले की, या कर्जाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या धरतीवरील दहशतवादाला खतपाणी घातले जाऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानला अर्थसहाय्य दिले जाऊ नये. आयएमएफने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी आमची मागणी आहे.
मागच्या आठवड्यात आयएमएफने पाकिस्तानला १ बिलियन डॉलर्सचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. दोन अण्वस्त्रधारी देशांत लष्करी कारवाई सुरू असताना एवढी मोठी आर्थिक मदत दिली गेल्याने भारताने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती.
भारताच्या आक्षेपांना न जुमानता आयएमएफने एकूण सात अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या रकमेतील दुसऱ्या हप्त्याचे एक अब्ज डॉलर्स पाकिस्तानला देण्यास मंजुरी दिली आहे. सध्याच्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे कर्ज दिल्याचे आयएमएफने जाहीर केले आहे. तसेच भविष्यात १.४ अब्ज डॉलर्सचा आणखी एक कर्जाचा हप्ता पाकिस्तानला देणार असल्याचेही आयएमएफने जाहीर केले आहे.