President Droupadi Murmu address to Nation : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित केले. यंदाचा प्रजासत्ताक दिन हा अनेक अर्थांनी राष्ट्राच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक क्षण ठरलेला आहे, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या राम मंदिर लोकार्पणाचे त्यांनी कौतुक केले. तसेच महिला विधेयक, जी-२० शिखर परिषद आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, याच आठवड्यात आपण ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार ठरलो. अयोध्येत एक भव्य असे राम मंदिर उभे राहिले आहे. या घटनेला एका व्यापक दृष्टीकोनातून पाहिले तर आपल्या दिसेल की, भविष्यात भारताच्या नागरी संस्कृतीचा पुर्नशोध घेण्यासाठी ही घटना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जमिनीबाबतचा निकाल दिल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराची वास्तू केवळ लोकांच्या श्रद्धेचाच नाही, तर न्यायालयीन प्रक्रियेवरील लोकांच्या प्रचंड विश्वासाचा पुरावा म्हणून पाहायला मिळते.

बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना नुकतेच मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचाही उल्लेख राष्ट्रपतींनी केला. सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणून ठाकूर यांचा नेहमीच उल्लेख केला जातो, असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या, “प्रजासत्ताक दिवस म्हणजे आपल्या मुलभूत मूल्यांचे आणि तत्त्वांचे स्मरण करण्याचा प्रसंग. जेव्हा आपण त्यापैकी कोणत्याही एका तत्त्वाचं चिंतन करतो, तेव्हा आपोआपच तत्त्वांची दिशाही आपल्याला मिळते. संस्कृती, श्रद्धा आणि रीतीरिवाजांची विविधता आपल्या लोकशाहीतून ध्वनित होते. विविधता साजरी करण्यातून समता ध्वनित होते, आणि त्या समतेला न्यायाचा आधार असतो. हे सर्व शक्य होतं ते स्वातंत्र्यामुळे. या सर्व मूल्यांची आणि तत्त्वांची समग्रता हीच आपल्या भारतीयत्वाचा पाया आहे. डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या परिपक्व विचारांनी मार्गदर्शित, या पायाभूत मूल्यांनी आणि तत्त्वांनी प्रेरित अशा संविधानाच्या गर्भितार्थाने, आपल्याला सर्व प्रकारच्या भेदभावांना समाप्त करण्यासाठी सामाजिक न्यायाच्या मार्गावर सातत्याने मार्गस्थ ठेवले आहे.”

“संसदेने ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्यावर, स्त्री-पुरुष समानतेच्या आदर्शाच्या दिशेने आपण आणखी प्रगती केली. नारी शक्ती वंदन अधिनियम हे स्त्री-सक्षमीकरणाचं क्रांतिकारी साधन ठरेल असा मला विश्वास वाटतो. आपल्या शासनप्रक्रिया सुधारण्याबाबतीतही ते अधिक उपयुक्त ठरेल. सामूहिक महत्त्वाच्या विषयांमध्ये जेव्हा स्त्रियांना सामील करून घेण्याचं प्रमाण वाढेल, तेव्हा बहुजनांच्या गरजांशी आपल्या प्रशासकीय प्राधान्यक्रमांचा ताळमेळ बसेल”, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

भारत चंद्रावर पोहोचला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला, तोही याचवर्षी. चांद्रयान-3 नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सौरमोहीमही उघडली. नुकतेच, आदित्य L1 ला हेलो कक्षेमध्ये यशस्वीपणे स्थापित करण्यात आले . एक्स्पोसॅट या आपल्या पहिल्या एक्स रे पोलॅरिमीटर उपग्रहाच्या प्रक्षेपणानं आपल्या वर्षाची सुरुवात झाली आहे. हा उपग्रह कृष्णविवरासारख्या अवकाशीय रहस्यांचा शोध घेणार आहे. या वर्षभरात म्हणजे २०२४ मध्ये आणखी अनेक अवकाश मोहिमा काढण्याचं नियोजन आहे. भारताच्या अंतराळ प्रवासात नवे मैलाचे दगड पार होणार आहेत हे सांगताना मला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram temple a testament of peoples trust in judicial process says president murmu kvg
First published on: 25-01-2024 at 20:57 IST