Ranya Rao Case : कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला ४ मार्च रोजी बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली. तिची झडती घेण्यात आली असता तब्बल १४.८ किलो सोनं आढळून आलं होतं. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असून दररोज या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, सोच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली कन्नड अभिनेत्री रान्या रावने अभिनेता मित्र तरुण राजूबरोबर दुबईला किमान २६ फेऱ्या मारल्या होत्या. त्याच दरम्यान त्यांनी सोन्याची तस्करी केल्याचं महसूल संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयात माहिती दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

वृत्तानुसार, डीआरआयने न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान या प्रकरणाबद्दल नवीन तपशील उघड केले आहेत. यामध्ये म्हटलं की, रान्या रावच्या २ वर्षांत ५२ दुबई फेऱ्या झाल्या आहेत, तर ५२ पैकी २६ फेऱ्यात मित्र तरुण राजू हा देखील बरोबर होता. या प्रवासाच्या पद्धतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यात अनेकदा रान्या राव आणि तरुण राजू हे सकाळी जायचे आणि संध्याकाळी परत यायचे. त्यांच्या या पद्धतीमुळे संशय निर्माण झाला, असं डीआरआयने न्यायालयाला सांगितलं. वृत्तात असंही म्हटलं आहे की, रान्या राव आणि मित्र तरुण राजू यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. रान्या रावने बुक केलेल्या तिकिटावर तरुण राजूनेही दुबईहून हैदराबादला प्रवास केला. यावेळी रान्या रावने त्याच्या खात्यात पाठवलेल्या पैशांचा वापर केला.

रान्या रावच्या २ वर्षात दुबईला ५२ फेऱ्या

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २०२३ ते मार्च २०२५ या दरम्यान रान्या रावने दुबईला ५२ फेऱ्या मारल्या. त्यापैकी किमान २६ फेऱ्यांमध्ये राजू तिच्याबरोबर होता. त्यामुळे संशय निर्माण होतो की याच दरम्यानच्या प्रवासात सोने तस्करी करण्यासाठी करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव हिला ३ मार्च रोजी दुबईहून परतताना बेंगळुरू विमानतळावर १२.५६ कोटी रुपयांच्या १४.२ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आणि २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले होते. तिला अटक करण्यात आल्यानंतर ती अद्याप कोठडीत आहे. तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि इतर एजन्सींनी केलेल्या तपासात अशी माहिती समोर आली की रावने या वर्षी किमान २६ वेळा दुबईला प्रवास केला आणि विमानतळ सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करून प्रत्येक ट्रिपमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे.