Rape Convict And Survivor Decided To Get Married: लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या पुरूषाने आणि पीडितेने एकमेकांशी लग्न करण्याची तयारी दर्शविल्यानंतर शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दोषी पुरूषाची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने जोडप्याला कोर्टरूममध्ये एकमेकांना फुलं देण्यास सांगितली.
“आम्ही जेवणाच्या सुट्टीच्या वेळी दोन्ही पक्षांना चेंबरमध्ये भेटलो. त्यावेळी दोषी आणि पीडित या दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे दोषी पुरूषाची शिक्षा रद्द करत आहोत”, असे न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेताना सांगितले.
न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने पुढे म्हटले की, “ते (बलात्कार प्रकरणातील दोषी आणि पीडित) एकमेकांशी लग्न करण्यास तयार आहेत. लग्नाबाबतच्या गोष्टी संबंधित पालकांनी ठरवाव्यात. आम्हाला आशा आहे की, लग्न शक्य तितक्या लवकर होईल. अशा परिस्थितीत, आम्ही शिक्षा स्थगित करतो आणि याचिकाकर्त्याची सुटका करतो. आज याचिकाकर्ता आम्ही दिलेल्या निर्देशानुसार या न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याला तुरुंगात परत घेऊन जावे आणि शक्य तितक्या लवकर संबंधित सत्र न्यायालयात हजर केले जावे.”
न्यायालयाने पुढे असे निर्देश दिले की, संबंधित सत्र न्यायालय दोषीला त्यांना योग्य वाटेल त्या अटींच्या अधीन राहून जामिनावर मुक्त करेल.
दरम्यान मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी या पुरूषाला दोषी ठरवून त्याची शिक्षा स्थगित करण्याची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर दोषीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
या प्रकरणात २०२१ मध्ये दोषीविरुद्ध खटला सुरू झाला होता. एफआयआरनुसार दोषीने २०१६ ते २०२१ दरम्यान लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप होता.
एफआयआरनुसार, पीडिता आणि दोषी पुरूषाची बहीण मैत्रीणी होत्या. त्यानंतर दोषी पुरूष आणि पीडितेची फेसबुकद्वारे भेट झाली होती. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि अनेक वेळा शारीरिक संबंध निर्माण झाले. एफआयआर मध्ये असा आरोप आहे की, प्रत्येक वेळी त्याने पीडितेला लग्न करण्याचे आश्वासन द्यायचा. जेव्हा पीडिता लग्न करण्यास मागे लागली तेव्हा त्याने नकार देत, लग्नाला आईची सहमती नसल्याचे सांगितले होते.