वास्कोमध्ये एका सात वर्षांच्या मुलीवर तिच्या शाळेतच बलात्कार झाल्याची घटना सोमवारी घडली असून या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांना निष्काळजीपणाचा आरोप ठेवून ताब्यात घेण्यात आले आहे. बलात्काराची ही घटना कळताच संतप्त निदर्शकांनी येथे जोरदार निदर्शने केली.
दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या या मुलीवर दुपारच्या सुटीत शाळेच्या शौचालयातच एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार केला. हे शौचालय मुख्याध्यापिकांच्या दालनाजवळच आहे. सदर अल्पवयीन मुलीने तक्रार केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेचे वृत्त कळताच पालक आणि स्थानिकांनी शाळेकडे धाव घेऊन शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा निषेध केला. वातावरण अधिकच तणावपूर्ण झाल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शाळेला भेट देऊन आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कोणत्याही परिस्थितीत आरोपीची आणि या प्रकारात हात असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पर्रिकर यांनी सांगितले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीन पीडित मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे.
सदर शाळेच्या प्रवेशद्वारावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपाययोजना शाळेत आखण्यात आल्या आहेत.