टाटा समूहाच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी म्हणून सायरस मिस्त्री यांनी संचालक मंडळाची दिशाभूल केल्याचे रतन टाटा यांनी म्हटले आहे. सायरस मिस्त्री यांना का काढण्यात आले याचा संपूर्ण खुलासा टाटा सन्सने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा सन्सच्या चेअरमनपदावरुन काढून टाकल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळावर अनेक आरोप केले होते. त्या आरोपांना टाटा सन्सने उत्तर दिले आहे तसेच अनेक बाबींचा खुलासा आज टाटा सन्सने केला आहे.

२०११ साली आपली चेअरमन म्हणून निवड व्हावी म्हणून सायरस मिस्त्री यांनी मंडळाची दिशाभूल केली. टाटा समुहाच्या एकूण विकासासाठी आपल्याकडे अनेक योजना असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले परंतु अध्यक्ष झाल्यावर त्याबाबत कुठलाही शब्द न काढल्याचे टाटा सन्सने म्हटले आहे.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संचालक मंडळाला त्यांच्या योजनेची काहीच माहिती दिली नाही तसे व्यवस्थापनाला देखील अंमलबजावणीचे आदेश दिले नाहीत. टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी पूर्णवेळ टाटा सन्सचेच काम करणे अपेक्षित होते परंतु त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायाकडे लक्ष दिले.

आपण आपल्या कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवून पूर्णवेळ टाटा सन्सचेच काम करू असे वचन सायरस यांनी दिले होते त्यांनी त्याची पूर्तता केली नसल्याचा खुलासा टाटा सन्सने केला आहे. टाटा कन्सल्टंसी सर्विसेस वगळता सर्वच कंपन्यांमध्ये नुकसान होऊ लागले होते आणि तेथील कर्मचाऱ्यांचा पगार देखील काढणे मुश्कील होऊ लागले होते असे टाटा सन्सने म्हटले आहे.

टाटा सन्स ही कंपनी तत्वनिष्ठ कंपनी आहे. सायरस यांचे कंपनीकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे टाटा सन्सच्या मूळ उद्दिष्टांना येथे बगल दिली जाऊ लागली होती. सायरस मिस्त्री यांचा वैयक्तिक स्वार्थ टाटा सन्सच्या उद्दिष्टांच्या आड येऊ लागला असल्याचे टाटांनी सांगितले.

सायरस मिस्त्रींनी हळुहळु आपल्याकडे सर्व अधिकार घेण्यास सुरुवात केली होती. टाटा सन्सच्या संचालक मंडळाला शक्तीहीन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यातूनच कंपनीचे नुकसान होऊ लागले होते असे स्पष्टीकरण टाटा सन्सने दिले आहे.

आपल्या वचनांची पूर्तता न केल्यामुळे त्यांच्या नेतृत्ववरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले अशा स्थितीत त्यांना अध्यक्षपदी ठेवता येणार नसल्याचा खुलासा टाटा सन्सने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratan tata cyrus mistry tata sons removal
First published on: 11-12-2016 at 17:58 IST