नवी दिल्ली : देशातील करोना मृत्यूच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यावरून विश्वासार्हतेचा वाद उफाळून आला आहे. आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या करोना मृत्यूच्या आकडय़ापेक्षा १० पटीने अधिक मृत्यू झाले आहेत, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आरोग्य संघटनेची आकडेवारी विश्वासार्ह नाही! जगभरातील सरकारांनी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ५६ लाख रुग्ण करोनामुळे दगावले पण, जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार १.५ कोटी करोना रुग्णांचा मृत्यू झाला. भारतच नव्हे तर अन्य देशांमध्येही तिथल्या सरकारांनी जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत

 ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य संघटनेने जमा केलेली आकडेवारी विश्वासार्ह नाही. संघटनेने कुठल्या कुठल्या संकेत स्थळांवरून माहिती जमा केली. त्यांच्या स्रोतावर विश्वास ठेवता येत नाही. संघटनेची आकडेवारी जमा करण्याची पद्धत शास्त्रीय नाही. निष्कर्ष काय काढायचा हे ठरवून आकडेवारी जमा करण्यात आली असल्याचा दावा डॉ. पॉल यांनी केला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यावरून काँग्रेस व भाजपमध्ये शुक्रवारी वाक्-युद्ध रंगले. ‘’विज्ञान खोटे बोलत नाही. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांबद्दल केंद्र सरकारने नम्रता दाखवली पाहिजे. केंद्र सरकारने या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली पाहिजे’’, अशी मागणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे केली. त्यावर, भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी, ‘’जागतिक आरोग्य संघटनेचा डाटा आणि काँग्रेसचा बेटा दोन्हीही चुकीचे आहेत. २०१४ पासून काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, त्यामुळे भारताच्या प्रतिमेलाही धक्का लागत आहे’’, अशी टीका केली.

‘डब्ल्यूएचओ’चा दावा..

 भारतात करोनामुळे २०२० व २०२१ या दोन वर्षांमध्ये ४७ लाख २९ हजार ५४८ मृत्यू झाले. २०२० मध्ये ८.३ लाख रुग्णांचा मृत्यू झाला, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार..

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ काळात ४.८१ लाख करोना रुग्णांचा मृत्यू झाला.