नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक आणि चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणी समितीमधील दुसऱ्या फेरबदलाची घोषणा केली. नड्डांच्या नव्या चमूमध्ये १३ उपाध्यक्ष, ९ महासचिव आणि १३ सचिवांचा समावेश आहे. या फेरबदलात सी. टी. रवी आणि सुनील देवधर यांना डच्चू देण्यात आला असून, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

नव्या रचनेत उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यांत ब्राह्मण आणि पसमंदा मुस्लिमांची समीकरणे जुळवण्यासह नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शहांच्या चमूतील सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव पदावरून डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याकडील आंध्र प्रदेशचे प्रभारीपद मात्र कायम ठेवण्यात आले आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांची महासचिव पदावरून उचलबांगडी झाली.

Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
ncp sharad pawar faction
आयात उमेदवारांवर राष्ट्रवादीची मदार
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
Bhalchandra Mungekar
वंचित आघाडीची भूमिका भाजपला अनुकूल; काँग्रेसचे डॉ. मुणगेकर यांचा आरोप

आहे. त्यामुळे आता राज्यात नवा प्रभारी नियुक्त केला जाणार असून नव्या चमूतील कैलास विजयवर्गीय यांच्याकडे कदाचित ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत सी. टी. रवी पराभूत झाले होते.महाराष्ट्रातून विनोद तावडे यांची महासचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली असून, सध्या त्यांच्याकडे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. ते १६५ मतदारसंघांच्या ‘प्रवासी लोकसभा’ प्रकल्पाचे समन्वयक असून, त्यांच्याकडे बिहारची जबाबदारीही देण्यात आली आहे. तावडेंवरील केंद्रीय नेतृत्वाच्या विश्वासामुळे त्यांची फेरनियुक्ती झाल्याचे मानले जाते.

राज्यातील राजकारणात कोंडी झाल्यामुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत येऊन सोनिया गांधींची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. या वावडय़ांकडे दुर्लक्ष करत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पंकजा यांना सचिवपदी कायम ठेवले आहे. त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पंकजा मुंडेंना अभय दिल्याचे मानले जात असून, आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडेंना राष्ट्रीय राजकारणामध्येच अधिक सक्रिय होण्याचा संदेश फेरनियुक्तीमुधून देण्यात आला आहे. राज्यातून विजया रहाटकर यांनाही सचिवपदी पुन्हा संधी दिलेली आहे.

राज्यांमधील निवडणुकीची जुळणी

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पुढील चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक असून, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये भाजपला विजयाची आशा असून, केंद्रीय नेतृत्वाने वसुंधरा राजेंशी असलेले मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तेलंगणच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी झालेले संजय बंडी यांचे केंद्रात पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांना महासचिव करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना उपाध्यक्ष पदावरून हटवले असले तरी, राज्यात चौहान हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असताना चौहान यांना उपाध्यक्ष केले होते. मात्र, केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांना मध्य प्रदेशच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे समन्वयक करून मोदी-शहांनी चौहान यांच्यावर दबाव कायम ठेवला आहे.

छत्तीसगडच्या राज्यसभेतील खासदार सरोज पांडे यांची पुन्हा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. सप्टेंबर २०२० मधील बदलामध्ये त्यांना डच्चू देण्यात आला होता. छत्तीसगडमधील माजी मंत्री लता उसेंडी यांनाही उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण-मुस्लिम

उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत पसमंदा मुस्लिमांची अधिकाधिक मते मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू व उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेचे सदस्य डॉ. तारिक मन्सूर यांना भाजपने उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे. मन्सूर हे पसमंदा मुस्लिम आहेत. भाजपने पहिल्यांदाच पसमंदा मुस्लिमांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे. राज्यसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद व उत्तर प्रदेशमधील सुमारे १० टक्के ब्राह्मण समाजातील बलाढय़ नेते लक्ष्मीकांत वाजपेयी यांनाही उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातून रेखा वर्मा यांचीही फेरनियुक्ती झाली आहे. गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासाठी मतदारसंघ सोडणारे राधामोहन अगरवाल यांना महासचिव करण्यात आले असून, सध्या ते केरळचे सहप्रभारी आहेत. मन्सूर, वाजपेयी आणि अगरवाल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन भाजपने उत्तर प्रदेशातील उच्चवर्णीय व मुस्लिम समीकरण अधिक भक्कम केले असल्याचे मानले जाते.

जुने भिडू कायम

नड्डांच्या चमूतील अरुण सिंह, कैलाश विजयवर्गीय, दुष्यंत कुमार गौतम, तरुण चुग यांच्या महासचिवपदाला धक्का लावलेला नाही. मात्र, पश्चिम बंगालचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, माजी केंद्रीयमंत्री राधामोहन सिंह व गुजरातच्या भारतीबेन शियाल यांची उपाध्यक्षपदावरून उचलबांगडी झाली आहे. याशिवाय, आसामचे लोकसभेतील खासदार दिलीप सैकिया, विनोद सोनकर यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. डी. पुरंदेश्वरी यांची आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्रीय सचिवपद काढून घेण्यात आले आहे.

कर्नाटकमधील पराभवानंतर बी. एल. संतोष यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी असल्याचे सांगितले जात होते. पण, पडद्यामागील सूत्रधार म्हणून संतोष यांच्याकडे संघटनेचे महासचिव व शिवप्रकाश यांच्याकडे संघटनेचे सह-महासचिव पदाची जबाबदारी कायम राहिली आहे.

नड्डांचा नवा चमू

उपाध्यक्ष : रमण सिंह, वसुंधरा राजे, रघुबर दास, सौदान सिंह, बैजयंत पांडा, सरोज पांडे, रेखा शर्मा, डी. के. अरुणा, एम. चुबा एओ, पी. अब्दुल्लकुट्टी, लक्ष्मीकांत बाजपेयी, लता उसेंडी, तारिक मन्सूर.

राष्ट्रीय महासचिव: अरुण सिंह, कैलाश विजयवर्गीय, दुष्यंत कुमार गौतम, तरुण चुग, विनोद तावडे, सुनील बन्सल, संजय बंडी, राधामोहन अग्रवाल.

संघटना महासचिव: बी एल संतोष, सह महासचिव: शिव प्रकाश

राष्ट्रीय सचिव: विजया रहाटकर, सत्य कुमार, अरिवद मेनन, पंकजा मुंडे, नरेंद्रसिंह रैना, अलका गुर्जर, अनुपम हाजरा, ओम प्रकाश धुर्वे, ऋतुराज सिन्हा, आशा लाकरा, कामाख्या प्रसाद तासा, सुरेंद्र सिंह नागर, अनिल अँटनी.
कोषाध्यक्ष: राजेश अग्रवाल; सहकोषाध्यक्ष: नरेश बन्सल

अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

’अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू व उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेचे सदस्य डॉ. तारिक मन्सूर यांना भाजपने उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.


’मन्सूर हे पसमंदा मुस्लिम असून, भाजपने पहिल्यांदाच या समाजाला राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे.


’माजी संरक्षणमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅण्टनी यांचे पुत्र अनिल अ‍ॅण्टनी यांनी राष्ट्रीय सचिवपदी वर्णी लागली आहे. अ‍ॅण्टनी केरळचे असून, तिथे भाजपने पक्षविस्तारासाठी लक्ष केंद्रित केले आहे.

’केरळमधील पी. अब्दुल्लाकुट्टी यांची उपाध्यक्षपदी फेरनियुक्ती केली आहे. मुस्लीम-ख्रिश्चन गणित जुळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.