जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध मंगळवारीही सुरू राहिला. त्यासाठी पोनी-तिरेथ भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेराबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी पोलीस, लष्कर व निमलष्करी दलाची ११ पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणी चौकशीसाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना ताब्यात घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उधमपूर-रियासी रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक रईस मोहम्मद भट यांनी माहिती दिली की, हल्ल्यानंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफची ११ पथके संयुक्तरित्या दोन निरनिराळ्या बाजूंना काम करत आहेत. अन्य एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘हल्ला झालेल्या ठिकाणी आणि आजूबाजूला ११ पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे. त्याबरोबरच विविध दिशांना घेराबंदी करण्यात आली आहे.’’ हे दहशतवादी रियासी आणि राजौरीच्या डोंगराळ जंगल भागात लपल्याचा संशय आहे.

हेही वाचा >>> कन्नड अभिनेता दर्शनला हत्येप्रकरणी अटक; बंगळूरु पोलिसांच्या कारवाईनंतर सहा दिवसांची पोलीस कोठडी

या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी सहभागी असल्याचा संशय आहे. मात्र, जखमी यात्रेकरूंनी नोंदवलेल्या जबाबावरून चौथ्या दहशतवाद्याचा सहभाग असल्याची शक्यता आहे, असे सोमवारीच सांगण्यात आले. लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अबू हमझाच्या आदेशावरून हल्ला झाल्याचा संशय आहे.

दहशतवाद्यांनी रविवारी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार केला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळून नऊ जण ठार तर ४१ जखमी झाले. ही बस कटारामधील वैष्णोदेवी मंदिराकडे जात होती. या बसमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीचे यात्रेकरू होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीमा बंद नसल्याने दहशतवाद जिवंत!

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेची परिस्थिती चांगली असली तरी पाकिस्तानबरोरची सीमा पूर्णपणे बंद नसल्यामुळे दहशतवाद अजूनही जिवंत आहे असे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला मंगळवारी म्हणाले. सीमेवर प्रत्येक ठिकाणी नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.